Home नंदुरबार जिल्हा आश्रमशाळेतील आठवी नंतर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी टॅबलेट देणार -डॉ.विजयकुमार गावित

आश्रमशाळेतील आठवी नंतर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी टॅबलेट देणार -डॉ.विजयकुमार गावित

(नंदुरबार): राज्यातील सर्व आश्रमशाळेतील आठवी नंतरच्या पुढील वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी टॅबलेट देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

ते नवापूर तालुक्यातील वडकळंबी, कोळदा, ढोंगसागाळी, भादवड येथील शासकीय मुलींच्या वसतीगृह/आश्रमशाळांच्या नूतन इमारतीचे भुमीपूजन प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती संगीता गावित, आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे, ता.नवापूरचे चेअरमन भरत गावित, सरपंच तेजस वसावे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मीनल करनवाल, तहसिलदार महेश पवार, सार्वजनिक बांधकाम विभाग (आदिवासी विकास) उपअभियंता ए.पी.चौधरी, सहायक प्रकल्प अधिकारी श्री.चौधरी, यांच्यासह स्थांनिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी डॉ.गावित म्हणाले की, जिल्ह्यात ज्या ठिकाणी नवीन आश्रमशाळाच्या इमारतींची गरज आहे अशा ठिकाणी नवीन इमारती बांधण्यास मंजुरी देण्यात येत असून खाजगी शाळेमध्ये ज्या सुविधा उपलब्ध असेल अशा सर्व सुविधा आश्रमशाळेत उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर्षी 56 नवीन इमारती बांधण्यास मंजूरी दिली त्यात नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक 35 शाळांचा समावेश आहे. या सर्व इमारतीचे भूमीपूजन करुन त्या लवकर सुरु त्या लवकरच सुरु व्हाव्यात अशी माझी अपेक्षा आहे. आश्रमशाळेतील मुलांना चांगले दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी आमच्या आदिवासी विकास विभागामार्फत विभागाची आहे, तशीच जबाबदारी पालकांची सुध्दा आहे. कारण पालकांनी सहकार्य केले नाही तरी मुलांच्या शिक्षणामध्ये गोडी निर्माण होणार नाही. पालकांनीही लक्षात घेतलेल पाहिजे की, एकदा आपल्या पाल्यास शाळेत दाखल केल्यानंतर वांरवार विद्यार्थ्यांस भेटण्यासाठी शाळेत येवू नये यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतो. प्रत्येक विद्यार्थ्यांने शाळेतील शिस्तीचे पालक करणे गरजेचे आहे. कारण शिस्त असली तरच विद्यार्थ्यांही पुढच्या काळात यशस्वी होतो. शाळेची शिस्त मोडण्याऱ्या अशा विद्यार्थ्यांवर कडक कार्यवाही करण्यात येईल. यावेळी पालकमंत्री महोदयांनी वडकळंबी आश्रमशाळेचा 100 टक्के निकाल लागल्यामुळे सर्व कर्मचाऱ्याचे अभिनंदन केले.

येत्या काळात आठवी नंतरच्या पुढील प्रत्येक वर्गासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी टॅबलेट देणार असून आश्रमशाळेत प्रवेश घेणारे विद्यार्थी हे पहिल्या वर्गापासून प्रवेश घेतात शाळेत दाखल होतांना त्यांचे वय खुप कमी असल्याने अशा विद्यार्थ्यांना स्वत:चे गणवेश व कपडे धुवावे लागतात यासाठी सर्व आश्रमशाळेत गणवेश व कपडे धुण्यासाठी वॉशिग मशीन उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आदिवासी विकास विभागामार्फत दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येत असून येत्या काळात आश्रमशाळा परिसरातच शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने देखील बांधण्यात येणार आहेत. प्रत्येक आश्रमशाळेचा निकाल हा 100 टक्के लागावा यासाठी राज्यातील सर्व आश्रमशाळेत एकाच पद्धतीने अभ्यासक्रम शिकविले जाणार असून सर्व विद्यार्थ्यांची दोन तीन महिन्यांनी परीक्षा तसेच शिक्षकांच्याही परीक्षा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रकल्प अधिकारी श्रीमती. करनवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ,पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version