वर्धा: नागपूर विभाग पदवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणी पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर यादी संकेतस्थळावर नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना यादीच्या प्रती उपलब्ध करून देण्यात आल्या.
यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी अनिल गावीत, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, नायब तहसिलदार अतुल रासपायले, भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, भाजपाचे शहर अध्यक्ष निलेश किटे, सीपीआयएमचे भैया देशकर, शिवसेनेचे श्रीकांत मिरापूरकर, शिवसेना (उबाठा) अविनाश भांडे आदी उपस्थित होते.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी वर्धा जिल्ह्यात 29 पदनिर्देशित मतदान केंद्राद्वारे एकुण 14 हजार 670 मतदारांची नोंदणी झालेली आहे. प्रारुप मतदार यादीतील 11 हजार 862 मतदार होते. यामध्ये 2 हजार 833 मतदारांची वाढ झाली असून यातील 25 मतदारांचे यादीतून नाव वगळण्यात आले आहे. अंतिम मतदार यादीनुसार 14 हजार 670 मतदाराची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. यापुढेही मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरु असून पदवीधर असलेल्या व्यक्तींनी मतदार यादीत आपले नाव समाविष्ठ करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले आहे.
