
अमरावती: रक्तकेंद्र व रक्त घटक विलगीकरण केंद्र, अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय विभागाने रुग्णसेवेमध्ये महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. सन 2025 या वर्षात शासकीय रक्तकेंद्र अमरावती यांनी 10 हजार 190 रक्त पिशव्यांचे संकलन केले असून, गेल्या चार वर्षात या रक्तकेंद्राने 40 हजारांहून अधिक रक्त पिशव्यांचे संकलन करून हजारो रुग्णांना जीवनदान दिले आहे. या वर्षात शासकीय रक्तकेंद्राने एकूण 227 रक्तदान शिबिरे यशस्वीपणे पार पाडली असून, यामुळे सिकलसेल, थॅलेसिमिया, हिमोफेलिया तसेच जटिल शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे.
जिल्ह्यातील एकमेव शासकीय रक्तपेढी असल्यामुळे हे केंद्र जिल्हा सामान्य रुग्णालय, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, क्षय रुग्णालय आणि अच्च्युत महाराज रुग्णालयासोबतच जिल्ह्यातील खाजगी रुग्णालये व सहा रक्त साठवणूक केंद्रांना नियमित रक्तपुरवठा करीत असते. जिल्ह्यालगतच्या मेळघाट येथील आदिवासी बांधव, गर्भवती माता, लहान बालके तसेच चिखलदरा व धारणी येथील रुग्णांनाही येथून मोठ्या प्रमाणात रक्ताचा पुरवठा केला जातो. विशेषतः सिकलसेल आणि ॲनिमियाग्रस्त रुग्णांना दर पंधरा दिवसांनी रक्ताची गरज भासते, त्यांच्यासाठी हे केंद्र अत्यंत महत्त्वाचे कार्य करीत आहे.
खासदार 365 दिवस रक्तदान मोहिमेअंतर्गत राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे, तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले आणि रक्त केंद्र प्रमुख डॉ. आशिष वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य करण्यात आले असून अविरत सुरु आहे. जनसंपर्क अधिकारी मिलिंद तायडे आणि समुपदेशक योगेश पानझाडे यांच्या अथक प्रयत्नांमुळे व संपूर्ण अधिकारी-कर्मचारी चमूच्या सहकार्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना वेळेवर रक्त पुरवठा करणे शक्य होत आहे. रक्ताची ही गरज निरंतर असल्याने जास्तीत जास्त सामाजिक संस्था, महाविद्यालये आणि तरुण मंडळांनी रक्तदान शिबिरांसाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार व रक्त केंद्रप्रमुख डॉ. आशिष वाघमारे यांनी केले आहे.