Home नंदुरबार जिल्हा आकांक्षित जिल्हा उपक्रमांची पूर्ण क्षमतेने अंमलबजावणी गरजेची – मा. अतिरिक्त सचिव श्री....

आकांक्षित जिल्हा उपक्रमांची पूर्ण क्षमतेने अंमलबजावणी गरजेची – मा. अतिरिक्त सचिव श्री. पियुष सिंह

Implementation of the desired district initiatives to their full potential is necessary – Hon. Additional Secretary Shri. Piyush Singh

नंदुरबार,

आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम अत्यंत परिणामकारक असून, ते पूर्ण क्षमतेने व समन्वयाने राबविल्यास नंदुरबार जिल्हा राज्यात अव्वल स्थान मिळवू शकतो, असे स्पष्ट मत भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाचे मा. अतिरिक्त सचिव श्री. पियुष सिंह यांनी व्यक्त केले.

मा. श्री. पियुष सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आकांक्षित जिल्हा व आकांक्षित तालुका कार्यक्रमाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मा. अतिरिक्त सचिव श्री. सिंह यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांचा दर्जा समाधानकारक असल्याचे नमूद करत, ग्राम, तालुका व जिल्हास्तरावर सर्व विभागांनी उत्कृष्ट समन्वयाने काम केल्यामुळेच हे यश साध्य झाल्याचे सांगितले. हीच कार्यगती व गुणवत्ता पुढील काळातही कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी पीपीटी सादरीकरणाद्वारे आरोग्य, अंगणवाडी, कृषी, किसान क्रेडिट कार्ड, ॲग्री-स्टॅक, मोटारसायकल ॲम्ब्युलन्स, मत्स्यव्यवसाय, तोरणमाळ पर्यटन विकास, सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन अभियान, मिशन जलबंधू, आमची अभ्यासिका, आदर्श ग्राम व शाळा विकास यांसह विविध उपक्रमांची माहिती दिली.

बैठकीदरम्यान सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन अभियानाच्या नवीन टप्प्याची सुरुवात करण्यात आली. आशा वर्कर श्रीमती प्रमिला गावीत व श्रीमती वंदना गावीत यांना मा. अतिरिक्त सचिव श्री. पियुष सिंह यांच्या हस्ते किट प्रदान करण्यात आले.

नंदुरबार जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आकांक्षित जिल्हा कार्यक्रम प्रभावी ठरत असून, पुढील काळातही हे उपक्रम अधिक गतीने राबविले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

#AspirationalDistrict#Nandurbar#DrMitaliSethi#PiyushSingh#DistrictDevelopment#GoodGovernance#TeamNandurbar#PublicService

error: Content is protected !!
Exit mobile version