‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत’ सोलापूर जिल्ह्यातील सात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाल्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र
0
Loan waiver certificates presented symbolically to seven farmers from Solapur district under the 'Punyashlok Ahilyadevi Holkar Loan Waiver Scheme'.
बँकेच्यावतीने नव्याने पीककर्जाचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुधाकरपंत परिचारक राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी वितरीत करण्यात आले. संकटांमध्ये आलेल्या व कर्ज भरू शकला नाही अशा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कर्जमुक्ती देण्याचा शब्द राज्यशासनाने पाळला असून देशातली ही सर्वात मोठी कर्जमुक्ती राबविण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, नियमित कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांनाही त्यांच्या खात्यावर ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत. कर्जमुक्तीची भव्य सुरुवात करण्याऐवजी पांडुरंगाच्या नगरीत जिथे शेतकरी, वारकरी इतक्या मोठ्या प्रमाणात येतात, तिथून याची सुरुवात करावी या उद्देशाने आज येथून कर्जमुक्तीची सुरुवात करण्यात येत आहे. त्यानुसार सहकार विभागाने १७ लाख शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली असून १३ हजार कोटी रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यावर ३१ तारखेपूर्वीच जमा करण्यात येणार आहेत. यापुढे जसजशी बँकाकडून माहिती जमा होईल तसतशा पुढील याद्या जाहीर करून कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात येईल. एकही पात्र शेतकरी या योजनेतून मागे राहणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, ७.५ हॉर्स पॉवरच्या आतील कृषीपंपांची वीजबिल माफी देण्यासाठी दरवर्षी २४ ते २५ हजार कोटी रुपये राज्य सरकार आपल्या तिजोरीतून महावितरणला देते. आता कर्जमुक्तीबरोबरच यापूर्वीची या कृषीपंपांची थकीत वीज देयकांची रक्कमही माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून ५० लाख शेतकऱ्यांचं ४८ हजार कोटी रुपयांचे वीजबिल माफ केलेले आहे. आता राज्यातल्या ७५ टक्के शेतकऱ्यांना आपण दिवसा वीज देतो आहोत. येत्या डिसेंबर किंवा मार्चपर्यंत १०० टक्के शेतकऱ्यांना आम्हाला दिवसा १२ तास वीज देण्यात येणार आहे.
कर्जमुक्ती, विजदेयकांच्या रकमेची माफी याव्यतिरिक्त गतवर्षी शेती क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या सबसिडींच्या माध्यमातून, ठिबक सिंचन, खते, ट्रॅक्टर किंवा यांत्रिकीकरण आदींसाठी सुमारे ९५ हजार कोटी खर्च केले आहेत. शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार अतिशय ताकदीने उभे आहे, असेही ते म्हणाले.
पंढरपूरच्या कॉरिडॉर विकासाची जवळजवळ सर्व तयारी झाली आहे. काही थोड्या लोकांच्या मनात शंका असल्या तरी चर्चेतून त्या सर्व शंका दूर करून सर्वांचे चांगल्यात चांगले पुनर्वसन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही तीर्थक्षेत्रामध्ये आजपर्यंत झालेल्या पुनर्वसनापेक्षा उत्तम, चांगलं आणि मोठं पुनर्वसन हे या ठिकाणी आम्ही पंढरपूरच्या कॉरिडॉरमध्ये देत आहोत. १०० टक्के लोकांचे समाधान करण्याचा उद्देश घेऊन हे काम आम्ही करत आहोत, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, भविष्यामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ताचे ( एआय) महत्त्व ओळखून, देशात पहिल्यांदा महाराष्ट्राने शेतकऱ्यांकरिता ‘महा विस्तार’ नावाचे एआय ॲप तयार केले आहे. जवळपास ५० लाख शेतकऱ्यांनी महा विस्तारवर नोंदणी केली असून उर्वरित शेतकऱ्यांनीही या ॲपवर नोंदणी करून उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, विजयकुमार देशमुख, उत्तमराव जानकर, नारायणराव पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन हरीश गायकवाड आदी उपस्थित होते.