
वर्धा येथील महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय नूतनीकरणाचे काम तसेच अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुल नवीन उभारणीच्या कामाचा आढावा शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत घेतला.
वर्धा जिल्ह्यातील या आदर्श शैक्षणिक संकुल उभारण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून संबंधित यंत्रणांनी समन्वयाने जबाबदारी पार पाडावी. नूतनीकरणातून जिल्हा परिषद महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इमारतीचे नूतनीकरण, अद्ययावत क्रीडांगणे, कंपाउंड वॉल आणि विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्याचे नियोजन आहे. याच परिसरात भव्य विज्ञान केंद्र व तारांगण उभारण्यात येणार असल्याने वर्ध्याच्या शैक्षणिक क्षेत्राला नवी दिशा मिळणार असल्याचे राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले.
विद्यालयाच्या परिसरातील कंपाउंड वॉल उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी मिळविण्याचा प्रस्ताव सादर करण्यात यावा. प्रस्तावित विकासकामे आणि उपलब्ध सुविधांचा विचार करता भविष्यात या विद्यालयाची विद्यार्थीसंख्या वाढणार असल्याने शाळेची सर्व मैदाने अद्ययावत करून विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात यावा, असेही राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले.
या बैठकीस आमदार संजय खोडके, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंग देओल यांच्यासह शालेय शिक्षण व सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.