लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी सखोल मतदार पुनरनिरीक्षणाला गती!
1
Momentum gathers for a comprehensive voter list revision to strengthen democracy!
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या सखोल मतदार पुनरनिरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आज शहादा येथे प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाची पाहणी केली.
यावेळी मतदार पडताळणी, अर्जांची छाननी, आवश्यक अभिलेखांची तपासणी तसेच मतदार यादी अद्ययावत करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होईल आणि कोणताही पात्र मतदार वंचित राहणार नाही, यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी मतदार पुनरनिरीक्षणाचे काम अचूक, पारदर्शक, वेळेत आणि त्रुटीविरहित पूर्ण करण्याचे निर्देश देत संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्येक अर्जाची काळजीपूर्वक पडताळणी करावी, असे सांगितले. मतदार यादीची विश्वासार्हता आणि निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी श्री. दीपक गिरासे, तहसीलदार श्री. संभाजी पाटील तसेच ब्लॉक लेव्हल अधिकारी श्री. गिते उपस्थित होते. त्यांनीही क्षेत्रीय पातळीवरील कामकाजाची माहिती सादर केली.
लोकशाहीची खरी ताकद प्रत्येक पात्र मतदाराच्या सहभागात आहे. त्यामुळे मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून, प्रत्येक पात्र नागरिकाने आपल्या मतदार नोंदणीची खात्री करून या मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.