
वर्धा: वयोमानपरत्वे जवळपास प्रत्येकच व्यक्तीत प्रेस्बायोपिया/Presbyopia अर्थात ‘जरादूरदृष्टीदोष’ किंवा ‘वृद्धापकाळातील दूरदृष्टीदोष’ हा आजार उद्भवतो. वर्धा जिल्ह्याला या आजारापासून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने नज फाउंडेशनसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. फाउंडेशनच्या सहकार्याने जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी व आजार आढळून आलेल्या व्यक्तींना विनामूल्य चश्मे वितरीत केले जातील. प्रेस्बायोपिया निदान व प्रतिबंधासाठी वर्ध्याला ‘मॉडेल’ जिल्हा बनविण्यात येणार असून त्याच धर्तीवर पुढे संपूर्ण राज्यात ही मोहिम राबविण्यात येणार आहे. या भागीदारीमुळे प्रतिबंधात्मक अंधत्व निवारणाला योगदान मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नज फाउंडेशनचे शिक्षण, पर्यावरण, उद्योजकता या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे. फाऊंडेशनच्या भागीदारीतून वर्धा जिल्ह्यात प्रेस्बायोपिया निदान आणि चष्मा वितरणाचे एक ‘मॉडेल’ तयार होईल. प्रतिबंधात्मक अंधत्व नियंत्रण हे माझ्या प्राधान्याच्या बाबींपैकी एक उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी फाउंडेशनचे सहकार्य चांगले योगदान देईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सामंजस्य करारानिमित्त सांगितले. वर्ध्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर व आमदार सुमित वानखेडे यांच्या विशेष पुढाकाराने हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.
नज फाउंडेशनसोबत भागीदारीतून संपुर्ण राज्याला ‘प्रेस्बायोपिया’मुक्त करण्याचे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी या आजाराचे निदान व चश्मे वाटपाची चौकट निश्चित करण्यासाठी वर्धा जिल्ह्यात 3 ते 6 महिन्याच्या कालावधीत प्रायोगिक तत्वावर ही मोहिम राबविण्यात येणार आहे. यासाठी साधारणपणे 4 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. या कामात वर्ध्याला ‘मॉडेल’ जिल्हा बनवून पुढे संपूर्ण राज्यात हा उपक्रम राबविला जाईल.
सन 2024 मध्ये वर्धा जिल्ह्याची लोकसंख्या साधारणपणे 14 लाख इतकी होती. त्यातील ग्रामीण लोकसंख्या 67 टक्के म्हणजे 9 लाख इतकी आहे. ग्रामीण भागात साधारणपणे 2 लाख प्रेस्बायोपियाचे रुग्ण असण्याचा अंदाज आहे. प्रत्येक नागरिकाची विनामुल्य प्रेस्बायोपियाची तपासणी करुन आजार आढळून आलेल्या रुग्णांना विनामूल्य चश्मे वितरीत केले जातील. प्रेस्बायोपिया रुग्णांची तपासणी व चश्मे वाटपानंतर त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होणार आहे.
नज फाऊंडेशनच्या भागीदारीतून ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या सहकार्याने वर्धा जिल्ह्यातील 35 वर्षावरील प्रत्येक व्यक्तींमध्ये प्रेस्बायोपियाबाबत जनजागृती केली जाईल. यासाठी आशा, नेत्र सखींना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नेत्रतज्ज्ञ, नेत्र सखी, आशा ग्रामस्तरावरच प्रेस्बायोपिया तपासणी करतील. हा आजार आढळून आलेल्या रुग्णांना त्यांच्या आवश्यक्तेप्रमाणे गावातच चश्मे वाटप करतील. नज फाउंडेशन उपक्रमासाठी आर्थिक सहाय्य व आवश्यक तेवढे चश्मे तसेच आवश्यक साहित्याचा पुरवठा करतील. मोहिमेंतर्गत प्रशिक्षण तसेच उपक्रमाचे नियंत्रण व मुल्यमापन करणार आहे.
प्रेस्बायोपिया म्हणजे काय?
प्रेस्बायोपिया म्हणजे वयोमानपरत्वे उद्भवणारा डोळ्यांचा आजार. याला ‘जरादुरदृष्टीदोष’ किंवा ‘वृद्धापकाळातील दुरदृष्टीदोष’ असेही म्हणतात. साधारणपणे 40 वर्षानंतर हा आजार दिसून येतो. यात डोळ्यातील लेन्स कमी लवचिक होत असल्याने जवळून पाहण्याची क्षमता कमी होते. लहान अक्षरे वाचताना त्रास होतो, डोकेदुखी होते आणि डोळ्यांवर ताण येतो. तज्ज्ञ डॅाक्टरद्वारे डोळ्यांची तपासणी आणि आवश्यक्तेप्रमाणे द्वि-फोकल चश्मा हा यावर उपाय आहे.
डिसेंबरमध्ये कारंजातून होणार सुरुवात
वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मोहिमेची सुरुवात होणार आहे. तालुक्यातील नेत्र सखी व आशांचे विशेष प्रशिक्षण नज फाउंडेशनच्यावतीने घेतले जातील. त्यानंतर टप्प्याटप्पाने जिल्हाभर मोहिम राबविली जाणार आहे.