Home महाराष्ट्र वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या महावितरणचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांचे...

वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या महावितरणचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांचे निर्देश

Prasad Reshme, Executive Director of Mahavitaran, directs to provide best service to customers including electricity bill collection

नंदुरबार :  सर्व ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा देण्यास प्राधान्य द्यावे. तसेच वीजहानी कमी करून वीजबिलांच्या वसुलीला आणखी वेग द्यावा, असे निर्देश महावितरणचे कार्यकारी संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांनी शुक्रवारी (6 मार्च) दिले.

         महावितरणच्या जळगाव परिमंडल कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत रेशमे बोलत होते. यावेळी मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी उपस्थित होते. कार्यकारी संचालक रेशमे म्हणाले की, परिमंडलातील जळगाव, धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांत गेल्या काही महिन्यांपासून वीजबिलांच्या थकबाकीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. महावितरणच्या आर्थिक स्थैर्यासाठी वीजबिल वसुलीशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. कोणत्याही सबबी न सांगता वीजबिलांची थकबाकी शून्य करण्यासाठी जोरकस प्रयत्न करा. यात हयगय करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा रेशमे यांनी दिला. जिल्ह्यात वीजबिलांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांची मोठी संख्या आहे. परिणामी वीजहानीत वाढ होत आहे. त्यामुळे विशेष मोहीम राबवून वीजचोरी आढळल्यास त्वरित कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. रूफटॉप सोलर ग्राहकांचे मीटर रीडिंग हे स्मार्ट मीटरच्या माध्यमातूनच यायला पाहिजे. तसेच औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांकडील वीजबिलांची थकबाकी कोणत्याही परिस्थितीत शंभर टक्के वसूल झाली पाहिजे. थकबाकीदार ग्राहकांनी प्रतिसाद न दिल्यास वीजपुरवठा खंडित करावा आणि त्यानंतर ग्राहक अनधिकृत वीजपुरवठा घेत नाही याची पडताळणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

महिना शंभर युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांना मोफत वीज मिळण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप सोलार (स्मार्ट) योजनेसाठी महावितरणने मागविलेल्या टेंडरमध्ये एक किलोवॅट क्षमतेच्या छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाची किंमत सुमारे 45 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. तसेच यात शासन अनुदान देणार असल्याने लाभार्थी ग्राहकांची मोठी बचत होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित ग्राहकांना प्रोत्साहित करा, असे निर्देश रेशमे यांनी दिले. यावेळी रेशमे यांनी विविध योजनांचा आढावा घेऊन कामांना वेग देण्याचे निर्देश दिले. बैठकीस जळगाव परिमंडलातील अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, वित्त व लेखा, माहिती तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version