Ø युवा शेतकऱ्यांच्या समस्याबाबत आढावा बैठक
Ø शेती क्षेत्रातील समस्यांसाठी समिती करण्याचे निर्देश
वर्धा : जिल्ह्यातील अनेक युवा शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करत आहे. या शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनासोबतच आवश्यक सुविधा निर्माण करून दिल्यास हे शेतकरी जिल्ह्यात चांगला बदल घडवून आणू शकतात. त्यामुळे त्यांना आवश्यक सुविधा पुरविण्यावर भर द्या, असे निर्देश पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्र्यांनी युवा शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. त्यांच्या अडचणी व त्यांना अपेक्षित आवश्यक सुविधांची माहिती घेतली. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता स्मिता पारखी, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ.जगदीश बुकतरे, सहाय्यक आयुक्त डॉ. संजय खोपडे, कृषि विभागाचे अधिकारी, युवा कृषि संघाचे युवा शेतकरी आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील तरुण शेतकरी आता पारंपारीक शेती सोडून बागायत आणि तंत्रज्ञानयुक्त आधुनिक शेतीकडे वळत आहे. मात्र पायाभूत सुविधांच्या अभावामुळे अडचणी येत आहे. विशेषत: पांदन रस्ते, कोल्ड स्टोरेज आणि वेळेवर मिळणारे अनुदान यावर तातडीने काम करण्याची गरज असल्याचे युवा शेतकऱ्यांच्यावतीने पालकमंत्री डॉ.भोयर यांना सांगण्यात आले.
यावेळी पालकमंत्री डॉ.भोयर म्हणाले, पांदन रस्ते बांधकाम मोहिम हाती घेण्यात आली असून पहिल्या टप्प्यात 25 किमी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील कोरडवाहू शेतीला सिंचनाखाली आणण्यासाठी हिंगणघाट तालुक्यात आजनसरा बॅरेज प्रकल्प, वर्धा तालुक्यातील धाम, बोर व आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पांतर्गत शेतीसिंचन वाढविण्याचा प्रयत्न सुरु आहे. सोबत वैनगंगा- नळगंगा हा राज्य शासनाने महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून प्रकल्पांतर्गत जोडल्या जाणाऱ्या गावातील तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार आहे, असे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.
युवा शेतकरी राहुल वांदिले यांनी युवा शेतकऱ्यांच्यावतीने कोरडवाहू शेती विकास, पांधनरस्ते खडीकरण, दिवसा 12 तास वीज पुरवठा, एपीएमसी पारदर्शकता, शेती फेन्सींग अनुदान, रोपवाटिका प्रमाणिकरण, नेट पॉलीहाऊस व ठिबक, पशुपालन व दुग्धविकास, पीक विमा तक्रार निवारण, गावपातळीवर वेधशाळा, कृषि प्रशिक्षण संस्था, फळ व फुल बाजार निर्मिती, अनुदान प्रक्रिया सुलभता, कोल्ड स्टोरेज साखळी, मुल्यवर्धन व प्रक्रिया उद्योग व प्रकल्प आधारित कर्ज पुरवठा आदी विषय व समस्या पालकमंत्री डॉ. भोयर यांच्याकडे मांडल्या.
युवा शेतकऱ्यांच्या मागण्या, अडचणी व त्यांनी सुचविलेल्या बाबींवर चर्चा व निर्णय घेऊन ठोस उपाय करण्यासाठी समिती नेमण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली. या समितीमध्ये विविध विभागाचे संबंधित अधिकारी तसेच युवा शेतकऱ्यांचा समावेश करावा, असे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले.
