Home नवापुर नवापूर तालुक्यातील रेल्वे क्रॉसिंग गेट बंद करण्याबाबत आढावा बैठक

नवापूर तालुक्यातील रेल्वे क्रॉसिंग गेट बंद करण्याबाबत आढावा बैठक

0
Review meeting regarding the closure of the railway crossing gate in Navapur Taluka.

नवापूर(प्रतिनिधी):-तहसील कार्यालय, नवापूर येथे उपविभागीय अधिकारी बंडु कापसे नंदुरबार यांच्या अध्यक्षतेखाली नवापूर तालुक्यातील रेल्वे क्रॉसिंग गेट बंद करण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली.सदर बैठकीस तहसीलदार दत्तात्रय जाधव, तसेच तालुका प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी, रेल्वे विभागाचे अधिकारी, संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच, पदाधिकारी तसेच नागरिक व शेतकरी उपस्थित होते. नवापूर तालुक्यात एकूण 7 रेल्वे क्रॉसिंग गेट असून, त्यापैकी 3  रेल्वे क्रॉसिंग गेट यापूर्वीच बंद करण्यात आले आहेत. उर्वरित रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक 67, 68, 70 व 73 बंद करण्याबाबत बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. रेल्वे क्रॉसिंग गेट बंद करण्यापूर्वी संबंधित परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी योग्य पर्यायी मार्ग व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच त्यांच्या दैनंदिन वाहतुकीवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, याबाबत विशेष चर्चा करण्यात आली. यावेळी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेट बंद करण्या संदर्भातील नियोजन व आवश्यक कार्यवाहीबाबत माहिती दिली. उपस्थित सरपंच, पदाधिकारी, शेतकरी व नागरिकांनी आपल्या विविध अडचणी, समस्या व सूचना प्रशासनासमोर मांडल्या. सदर समस्यांवर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे विभागाचे अधिकारी व तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
नागरिकांची सुरक्षितता, शेतकऱ्यांची वाहतूक सुविधा आणि पर्यायी मार्गांची उपलब्धता यांचा विचार करूनच पुढील कार्यवाही करण्यात यावी, यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.