Home शैक्षणिक विद्यार्थी हितासाठी प्राध्यापक भरती प्रक्रियेचे कालबद्ध नियोजन करा – मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थी हितासाठी प्राध्यापक भरती प्रक्रियेचे कालबद्ध नियोजन करा – मंत्री चंद्रकांत पाटील

Timely planning of professor recruitment process for the benefit of students – Minister Chandrakant Patil

मुंबई: राज्यातील विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांमधील प्राध्यापक पदांच्या भरतीला शासनाने मान्यता दिली असून ही भरती प्रक्रिया कालबद्ध नियोजन करून पूर्ण करावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिले.होमी भाभा राज्य विद्यापीठ येथे मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरू व प्र-कुलगुरूंची राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (एनईपी २०२०) अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते.यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, सहसचिव संतोष खोरगडे तसेच अकृषी विद्यापीठांचे सर्व कुलगुरू, प्र-कुलगुरू व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले की, राज्यातील विद्यापीठांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रमवारीत (रँकिंग) वाढविण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे. विद्यापीठांनी कालबद्ध नियोजन करून शैक्षणिक गुणवत्ता, संशोधनवृद्धी, अध्यापनातील नावीन्य आणि प्रशासकीय कार्यक्षमता यांना प्राधान्य द्यावे. गुणवत्ता वृद्धीसाठी ठोस कृती आराखडा तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

बैठकीत प्राध्यापक भरती प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांमधील रिक्त पदांची माहिती संकलित करून नियमानुसार भरती प्रक्रिया राबवावी, असे निर्देश देण्यात आले. सर्व संबंधित संस्थांनी प्राध्यापक भरती प्रक्रिया जून २०२६ पर्यंत पूर्ण करावी, असेही स्पष्ट करण्यात आले.

निर्धारित मुदतीपर्यंत प्राध्यापक भरती प्रक्रिया पूर्ण न झाल्यास संबंधित विद्यापीठे व महाविद्यालयांतील पदसंख्या कमी करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही मंत्री पाटील यांनी दिला.

error: Content is protected !!
Exit mobile version