मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वात राजकारणापेक्षा संवेदनशीलता अधिक ठळकपणे जाणवते. त्यांचा स्वभाव मुळात पारंपरिक राजकारणी स्वरूपाचा नसला, तरी एकदा निर्णय घेतला की तो ठामपणे अंमलात आणण्याची त्यांची शैली ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या गुणांची आठवण करून देणारी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत म्हटले.
विधान परिषदेतून निवृत्त होत असलेल्या उद्धव ठाकरे, डॉ. नीलम गोऱ्हे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, राजेश राठोड, संदीप जोशी, दादाराव केचे, रणजितसिंह मोहिते-पाटील आणि संजय केनेकर या सदस्यांना निरोप देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राजकारणात मतभेद, भूमिका आणि संघर्ष असले तरी त्या पलीकडे सहप्रवासाचे एक वेगळे नाते असते. उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा प्रवास अनेक वर्षांचा असून, या काळात समाज आणि राज्याच्या हितासाठी अनेक चांगल्या गोष्टी एकत्रितपणे करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्रातील गडकिल्ले, निसर्ग आणि वारकरी परंपरेतील क्षण त्यांनी अत्यंत प्रभावीपणे आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहेत. ‘महाराष्ट्र देशा’ आणि ‘पाहावा विठ्ठल’ ही त्यांची कामे केवळ छायाचित्रणापुरती मर्यादित नसून राज्याच्या सांस्कृतिक वारशाची जपणूक करणारी असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणशैलीची मांडणी सहज, संवादात्मक आणि विनोदी कोट्यांनी परिपूर्ण असते. जरी ते आक्रमक शैलीत बोलताना दिसत असले तरी त्यांचा मूळ स्वभाव शांत, संयमी आणि संबंध जपणारा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विधानपरिषदेच्या उपसभापती तथा ज्येष्ठ नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे या महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने झटणाऱ्या, अभ्यासू, संवेदनशील आणि प्रभावी सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. केवळ आमदार म्हणून नव्हे तर एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांनी अधिक प्रभावीपणे काम केले आहे. महिलांवर अन्याय, अत्याचार किंवा एखादी सामाजिक घटना घडली की, त्या तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतात आणि संबंधितांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतात.
अमोल मिटकरी यांच्याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मिटकरी यांना विविध विषयांवर, विशेषतः शेती क्षेत्रांमध्ये चांगले ज्ञान आहे. या सर्व विषयांमध्ये ते सातत्याने सक्रिय राहून काम करत आहेत. शशिकांत शिंदे यांनी कामगार चळवळ सक्षमपणे पुढे नेण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. बदलत्या अर्थव्यवस्थेच्या गरजा ओळखून कामगारांच्या हितासाठी त्यांनी सातत्याने भूमिका मांडली असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले. राठोड हे जालना जिल्ह्यातील मराठवाडा भागातील नेतृत्व असून शैक्षणिक, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी संघटनात्मक कार्यात सक्रिय सहभाग घेतला. शिक्षक असले तरी विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, कृषी आणि सहकार क्षेत्रात मोठे योगदान दिले.
संजय केनेकर यांचा सार्वजनिक जीवनातील प्रवास प्रेरणादायी आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली. सार्वजनिक जीवनातील त्यांची सातत्यपूर्ण वाटचाल अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. दादाराव केचे यांनी सातत्याने लोकसेवेचे काम केले आहे. कामांचा पाठपुरावा करण्याची त्यांची शैली विशेष उल्लेखनीय मानली जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली वर्धा जिल्ह्यात अनेक विकासकामांना गती मिळाली.
रणजितसिंह मोहिते पाटील हे महाराष्ट्रातील उदयोन्मुख युवा नेतृत्व म्हणून पुढे आले आहेत. सहकार, शेती, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांचा सहभागही उल्लेखनीय असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सर्व निवृत्त सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
