Home महाराष्ट्र शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन युवकांनी रोजगार देणारे व्हावे

शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन युवकांनी रोजगार देणारे व्हावे

Youth should become job creators by taking advantage of government schemes

अमरावती : सध्याच्या स्पर्धात्मक युगात युवकांनी केवळ नोकरीच्या शोधात राहू नये. आपल्यामधील कौशल्यांनी युवकांनी रोजगार देणारे व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व स्नेहमेळावा’ आज पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, उमेदवारांनी केवळ पदवीवर अवलंबून राहू नये. युवकांनी आता कौशल्यावर भर देणे आवश्यक आहे. सुरुवातीला पगारापेक्षा अनुभवाचा विचार करावा. आपल्यातील कौशल्य वाढवून युवकांनी स्वत:चा रोजगार उभारावा. तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन उद्योगाचे स्वरूप वाढावे, असे आवाहन केले.

आजच्या रोजगार मेळाव्यात लेक्साकेम ओर्गानिक, जाधव गियर्स, अर्थ वे टेक्नॉलॉजी यांसारख्या 6 नामांकित कंपन्यांचा सहभाग होता. यात 63 रिक्त पदांसाठी 126 उमेदवारांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष मुलाखतीनंतर 42 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. यातील 8 उमेदवारांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते तात्काळ नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. स्नेहमेळाव्यात 103 उमेदवारांनी सहभाग नोंदविला.

यावेळी जागतिक कौशल्य स्पर्धेच्या राज्यस्तरीय फेरीमध्ये यश मिळवणारे आदर्श लिहारे, निशा बंड, शशांक लोखंडे आणि विराज पुसदकर यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात कंपन्यांमध्ये रुजू झालेल्या उमेदवारांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी कौशल्य विकास विभागाचे उपायुक्त द. ल. ठाकरे, सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, रेडियंट हॉस्पिटलच्या संचालक डॉ. माधुरी अग्रवाल, ईसीईचे संचालक समीर काळे, गोल्डन फायबरचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. प्रसाद आदी उपस्थित होते. श्री. ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रांजली बारस्कर यांनी प्रास्ताविक केले, प्राजक्ता राऊत यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

error: Content is protected !!
Exit mobile version