
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते मुंबईफर्स्ट या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह २०२६’ या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती, ‘मुंबई फर्स्ट’चे अध्यक्ष नरिंदर नायर, उपाध्यक्ष अशांक देसाई आदी उपस्थित होते.
एकविसाव्या शतकात ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे फक्त भारतीय तत्त्वज्ञान नाही, तर दैनंदिन जीवनातील वास्तव आहे. या तत्त्वज्ञानासह भारताने नेहमीच विविध क्षेत्रात सहकार्याचा हात पुढे करत ग्लोबल साऊथचा आवाज बुलंद केला आहे. आपली शहरे उत्तम, सर्वसमावेशक आणि भविष्याला आकार देणारी ठरण्यासाठी ब्रिक्स देशांनी परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्याचे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
संत तुकाराम महाराज यांच्या ‘एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ या उक्तीचा संदर्भ देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्रिक्स देशांतील शहरांनी परस्पर सहकार्याने विकासाचा मार्ग प्रशस्त करण्याचे आवाहन केले. ब्रिक्स देशांनी एकमेकांना प्रगत तंत्रज्ञान, अनुभव, ज्ञान आणि माहितीचे आदान-प्रदान केले पाहिजे. अशा परस्पर सहकार्यातूनच देश जवळ येतील, जागतिक विकासाला खरी गती मिळेल आणि प्रत्येक शहराला शाश्वत विकास साधणे शक्य होईल, असेही ते यावेळी म्हणाले