(मुंबई) बुलढाणा, यवतमाळ आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांमधील पिकांचे तातडीने पंचनामे करुन शासनाकडे लवकर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. (Heavy Losses due to Flood)
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद तसेच यवतमाळ, नांदेडसह अनेक जिल्ह्यांमध्ये काल झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील पिके पाण्याखाली गेले आहेत. शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून शासनाकडे लवकर प्रस्ताव पाठविण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव आणि मदत व पुनर्वसन विभाग तसेच मुसळधार पाऊस झालेल्या क्षेत्रातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या भागातील ग्रामस्थांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले असून त्यांना स्थानिक ग्रामस्थांच्या घरांच्या नुकसानीचेदेखील पंचनामे करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. अतिवृष्टीमुळे पूर आलेल्या गावांमधील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून त्यांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे, त्याठिकाणी ग्रामस्थांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात याव्यात आणि आपत्तीकाळात जिल्हा प्रशासनाने दक्ष राहण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
अतिवृष्टीचा फटका राज्यातील अनेक जिल्ह्यांना बसला आहे. ग्रामीण भागातील लहान पूल व रस्त्याचीही मोठी दुर्दशा झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी दरवर्षी पूराच्या पाण्यामुळे रस्ते बंद झाल्याने संपर्क तुटतो. अशा गावांची व ठिकाणांची यादी करुन त्याठिकाणी नवीन पूलाच्या कामाबाबत प्राधान्याने विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. याचबरोबर पूरामुळे बऱ्याच गावात शेतजमीन खरडून जाते. अशी गावे व शेतशिवाराच्या जागांची निवड करुन त्याठिकाणी मृदसंधारणाच्या दृष्टीने, पाणलोटाच्या दृष्टीने वेगळा विचार करुन मनरेगामार्फत जे काही करता येईल त्याबाबत शासन पातळीवर चर्चा करुन निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.
गेल्या दोन दिवस झालेल्या सततधार पावसामुळे सर्वत्र मोठे नुकसान झाले आहे. शेतपिकांसह घरे, जनावरे, शासकीय मालमत्तेचीही हाणी झाली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना तातडीने 5 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान व धान्याचे वाटप करा. नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करा, असे निर्देश मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिले.
बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यात परवा प्रचंड पाऊस झाला. बहुतांश मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेती व घराचे देखील नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वे तातडीने करण्यात यावे. एकही नुकसानग्रस्त सुटणार नाही याची दक्षता घ्या. शेतपिकांचे नुकसान झालेच शिवाय शेतजमिनी देखील खरडून गेल्या, त्याचा स्वतंत्र अहवाल सादर करावा. तातडीची मदत म्हणून शासनाच्या धोरणाप्रमाणे नुकसानग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 5 हजाराचे सानुग्रह अनुदान व धान्य दोन दिवसात वाटप करा. धान्य देत असतांना धान्यासोबत अन्य आवश्यक खाद्य पदार्थाची किट सामाजिक संस्थांच्या मदतीने देता येईल तर तसा प्रयत्न करावा, असे श्री.पाटील म्हणाले.
शेती व शेतपिकांसह शासकीय मालमत्तेचे जे नुकसान झाले आहे, त्याचे देखील सर्वेक्षण करण्यात यावे. या नुकसानीसाठी जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी कसा उपलब्ध करून देता येतील यासाठी प्रयत्न करू. स्थलांतरीत केलेल्या नागरिकांना निवारागृहात भोजनासह आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्या. कृषि, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपआपल्या मालमत्तांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून अहवाल मदत व पुनर्वसन विभागास सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
अतिक्रमीत जागेवर वास्तव्य करणाऱ्या अनेक गोरगरिबांची घरे पडली आहे. अशा अतिक्रमीत नुकसानग्रस्तांना देखील मदत मिळणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी बैठकीत सांगितले. त्यांना कशी मदत करता येईल यासाठी निश्चितच प्रयत्न करू असे श्री.पाटील यांनी सांगितले. खरडून गेलेल्या जमीनीचा स्वतंत्र अहवाल करावा, असे निर्देश बैठकीत पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. आ.मदन येरावार यांनी यवतमाळ शहरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना सानुग्रह अनुदान लगेच वाटप करणे आवश्यक आहे, असे सांगितले.