Home महाराष्ट्र संत रविदासांच्या विचारांचा व्यापक अभ्यास, प्रसार होणे आवश्यक  – मंत्री ॲड. आशिष...

संत रविदासांच्या विचारांचा व्यापक अभ्यास, प्रसार होणे आवश्यक  – मंत्री ॲड. आशिष शेलार

It is necessary to study and disseminate the thoughts of Saint Ravidas extensively – Minister Adv. Ashish Shelar

मुंबई: भारतीय आध्यात्मिक परंपरेतील महान संत रविदास यांचे विचार, तत्त्वज्ञान आणि कार्य अत्यंत प्रेरणादायी व समाजप्रबोधनात्मक असून, त्यांचा व्यापक अभ्यास आणि प्रसार होणे आवश्यक आहे. या अनुषंगाने पुणे येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या विद्यापीठातील ‘स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस’ विभागाने तयार केलेल्या संशोधन प्रकल्पाची केंद्र सरकारकडे तातडीने शिफारस करण्यात यावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांस्कृतिक कार्य विभागास दिले.

संत रविदास यांचे भारतीय तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि भक्ती परंपरेतील योगदान महत्त्वपूर्ण असूनही त्यांच्या कार्याचे अपेक्षित प्रमाणात संशोधन झालेले नाही. आजच्या तरुण पिढीसमोर त्यांचे विचार प्रभावीपणे मांडण्याची आवश्यकता असून ते समाजासाठी प्रेरणादायी ठरू शकतात, असे मत मंत्री ॲड. शेलार यांनी व्यक्त केले.

भक्ती परंपरेतील संत रविदास यांचे सातत्यपूर्ण अस्तित्व तसेच गुरु ग्रंथ साहिब यांसारख्या प्रमाणग्रंथांमध्ये त्यांच्या रचनांचा समावेश असूनही त्यांच्या कार्याचा सखोल अभ्यास अपेक्षित प्रमाणात झालेला नाही. या पार्श्वभूमीवर डेक्कन एज्युकेशन सोसायटी विद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस’ विभागाने संत रविदास यांच्या तत्त्वज्ञान, सामाजिक विचार आणि सांस्कृतिक वारशाचा अभ्यास करून एक संशोधन प्रकल्प तयार केला आहे.

या संदर्भात मंत्री ॲड. शेलार यांनी ऑनलाईन बैठकीत संबंधित प्रकल्पाचे सादरीकरण पाहून सविस्तर माहिती घेतली. संत रविदास यांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या विचारांचा जागतिक स्तरावर प्रसार करण्यासाठी हा प्रकल्प केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या ‘माननीय व्यक्तींच्या जन्मशताब्दी योजना’ अंतर्गत सादर करता येऊ शकतो, असे बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले. त्यानुसार या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करून केंद्र सरकारकडे शिफारस सादर करण्यात यावी, अशा सूचना मंत्री ॲड.शेलार यांनी दिल्या.

या प्रकल्पामध्ये संत रविदास यांच्या तत्त्वज्ञानाचे अभ्यासपूर्ण पुनर्मूल्यांकन, त्यांच्या सांस्कृतिक वारशाचे पुनरुज्जीवन तसेच समकालीन शैक्षणिक, सामाजिक आणि धोरणात्मक संदर्भांमध्ये त्यांच्या विचारांच्या प्रसारासाठी शाश्वत चौकट विकसित करण्याचा समावेश आहे.

या बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक श्रीराम पांडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version