Home आरोग्य ‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानाला बळ; महाविद्यालयीन युवकांसाठी ‘कॅम्पस कनेक्ट’ मोहिमेचा शुभारंभ

‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानाला बळ; महाविद्यालयीन युवकांसाठी ‘कॅम्पस कनेक्ट’ मोहिमेचा शुभारंभ

0
Boost for ‘Drug-Free Navi Mumbai’ campaign; ‘Campus Connect’ initiative launched for college youth.

नवीमुंबई पोलिसांच्या ‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानाअंतर्गत महाविद्यालयीन युवक-युवतींमध्ये अमली पदार्थांच्या सेवनाविरोधात जनजागृती करण्यासाठी ‘कॅम्पस कनेक्ट’ या विशेष मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नेरूळ येथील डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीज सेंटर ऑफ एक्सलन्स येथे संपन्न झाला.

कार्यक्रमास वन मंत्री गणेश नाईक, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार महेश बालदी, आमदार रवींद्र फाटक, आमदार विक्रम पाटील, नवी मुंबई महानगरपालिका महापौर सुजाता पाटील, पनवेल महानगरपालिका महापौर नितीन पाटील, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे, पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे आदी मान्यवर उपस्थित होते.

आजच्या तरुण पिढीमध्ये अमली पदार्थांचे वाढते आकर्षण आणि त्याचे होणारे गंभीर सामाजिक, शारीरिक व मानसिक परिणाम लक्षात घेता नवी मुंबई पोलिसांनी या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. महाविद्यालयीन परिसर हा युवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा महत्त्वाचा टप्पा असल्याने या वयोगटात योग्य माहिती व जागरूकता निर्माण करणे, हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.

देशाची ६५% युवाशक्ती ही आपली मोठी ताकद आहे. या युवाशक्तीला निष्प्रभ करण्यासाठी शत्रू राष्ट्रे आणि असामाजिक घटक तरुणांना व्यसनाधिनतेकडे वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. या लढाईत अमली पदार्थांची पुरवठा साखळी (सप्लाय चेन) पूर्णपणे नेस्तनाबूत करणे आणि तरुणांमध्ये जागृती निर्माण करून मागणी (Demand Side) संपवणे, अशा सर्वांगीण (३६०-डिग्री) अप्रोच ही काळाची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्र व व्यसनमुक्त चित्रफितीचे लोकार्पण करण्यात आले. तसेच या अभियानानिमित्त आयोजित जनजागृतीपर पोस्टर्स व रील्स स्पर्धेत निवडलेल्या सर्वोत्तम प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.