Home टेक न्युज राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती; आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी आणखी ६०० डॉक्टरांची भरती

राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती; आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी आणखी ६०० डॉक्टरांची भरती

0
1,440 doctors to be appointed in the state soon; another 600 doctors to be recruited to strengthen healthcare services.

राज्यात येत्या काही दिवसांत १,४४० डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे तसेच आणखी ६०० डॉक्टरांसाठी जाहिरात काढण्यात येत असून, सुमारे २५० दंतचिकित्सकही लवकरच आरोग्य सेवेसाठी उपलब्ध होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महिला आरोग्य समिती, जन आरोग्य समिती आणि रुग्णकल्याण समितीच्या सदस्यांशी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ऑनलाइन पद्धतीने ‘जन आरोग्य संवाद’ साधला. आरोग्य समित्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सहा लाखांहून अधिक नागरिकांशी संवाद साधण्यात आला आहे. भविष्यात आणखी चार लाख नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेत त्या सोडविण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी सांगितले.

या संवादात आरोग्य समित्यांच्या बैठका नियमित होतात का, डॉक्टर वेळेवर उपस्थित राहतात का, डॉक्टरांचा रुग्णांशी योग्य संवाद होतो का आणि रुग्णालयांमध्ये आवश्यक सेवा उपलब्ध आहेत का, याची थेट माहिती घेण्यात आली. स्थानिक पातळीवरील अडचणी समजून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार आहे. आरोग्य व्यवस्था कागदावर नव्हे, तर प्रत्यक्ष रुग्णालयात आणि नागरिकांच्या अनुभवातून दिसली पाहिजे, असे आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी यावेळी स्पष्ट केले.