28 ते 30 ऑगस्ट दरम्यान विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन; ‘खेलेगा भारत, जितेगा भारत’ संकल्पनेवर राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होणार
(नंदुरबार) हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे 29 ऑगस्ट रोजी ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ उत्साहात साजरा करण्यात येत आहे. क्रीडा व खेळाचा प्रचार-प्रसार व्हावा, शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत खेळाचे महत्त्व पोहोचावे तसेच युवक-युवतींमध्ये क्रीडा संस्कृतीचे संवर्धन व्हावे, यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने 28 ते 30 ऑगस्ट 2026 या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी महेश पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
यावर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन ‘खेलेगा भारत, जितेगा भारत’ या मुख्य संकल्पनेवर आधारित असून, ‘आदर, खेळ आणि हालचाल’ (Tribute, Play and Move) या तीन प्रमुख स्तंभांवर हा उत्सव साजरा केला जाणार आहे.
कार्यक्रमांची रूपरेषा व वेळापत्रक:
28 ऑगस्ट 2026 (स्मरण व 29 आव्हाने):
• फ्लोरल ट्रिब्यूट (Floral Tribute): मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात येईल.
• ‘29 आव्हाने’ (29 Challenges) उपक्रम: सहभागी खेळाडू व नागरिकांनी कोणताही क्रीडा प्रकार 29 वेळा करण्याचे आव्हान पूर्ण करावयाचे आहे. यामध्ये हॉकी ड्रीबल, फुटबॉल किक, बास्केटबॉल ड्रीबल, स्कीपिंग (दोरीच्या उड्या), हॉकी पेनल्टी शूटआऊट, धावण्याची स्पर्धा, 3 कि.मी. चालण्याची स्पर्धा, पुश-अप्स, सिट-अप्स, रस्सीखेच यांसारख्या प्रकारांचा समावेश असेल. खेळाडूंनी या उपक्रमांचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून इतरांनाही आव्हान स्वीकारावयास प्रेरित करावे.
29 ऑगस्ट 2026 (हॉकी स्पर्धा):
• ‘एक घंटा खेल के मैदान में’ या उपक्रमांतर्गत जिल्हा क्रीडा संकुल, नंदुरबार येथे ‘मेजर ध्यानचंद हॉकी चषक स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.
30 ऑगस्ट 2026 (पारितोषिक वितरण):
• तीन दिवसीय क्रीडा महोत्सवाचा समारोप तसेच आयोजित विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल.
निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी आणि जिल्ह्यात क्रीडामय वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व खेळाडू, शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी व नागरिकांनी या उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

