महाराष्ट्राला देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनविण्याचा निर्धार; विकासाचे ‘चेंज मेकर्स’ बना – एकनाथ शिंदे
जगभर झपाट्याने विकास होत असून आपणही देश आणि राज्याच्या गतिशील विकासाचे चेंज मेकर्स बना असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुंबईच नव्हे तर संपूर्ण राज्याला देशाचे ग्रोथ इंजिन बनविण्यासाठी सरकारने पावले उचलल्याचे त्यांनी सांगितले.
इकॉनॉमिक टाइम्स बिझनेस कॉनक्लेव्ह अँड अवॉर्ड्स २०२६ मध्ये सहभागी होताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्राची विकासाची वाटचाल ही केवळ आर्थिक प्रगतीपुरती मर्यादित नाही. ती आधुनिक, शाश्वत, जागतिक स्पर्धेत सक्षम आणि सर्वसामान्यांसाठी अनुकूल असावी, अशी सरकारची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले.
केवळ मुंबई-केंद्रित विकास न करता नागपूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, नवी मुंबई तसेच विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडत आहे. टियर-२ आणि टियर-३ शहरांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून ते स्वयंपूर्ण आर्थिक केंद्रे बनविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले की, इंडस्ट्रियल पार्क, आयटी झोन, लॉजिस्टिक्स हब, मेट्रो कनेक्टिव्हिटी आणि रोजगार क्लस्टर्सच्या माध्यमातून या शहरांमध्ये गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जात आहेत. महाराष्ट्राला देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनविण्याचे उद्दिष्ट आहे.
विकासाचा खरा अर्थ सर्वसामान्यांच्या जीवनमानात सुधारणा होणे हा आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांसोबत परवडणाऱ्या घरांनाही शासनाने प्राधान्य दिले आहे.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असून, राज्यात गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील तरुणांना संधीच्या शोधात राज्याबाहेर जावे लागू नये, यासाठी राज्यातच उद्योग, गुंतवणूक आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या जात आहेत. विकसित महाराष्ट्राशिवाय विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. येणाऱ्या पिढ्यांसाठी आधुनिक, शाश्वत, जागतिक स्पर्धेत सक्षम आणि सर्वसामान्यांसाठी अनुकूल महाराष्ट्र घडविणे हेच आमचे ध्येय आहे,असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.