रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी प्रशिक्षण; १ लाख ६५ हजार ८०० चालकांना दिले भाषेचे धडे
महाराष्ट्रात रिक्षा व टॅक्सी चालविणाऱ्या अमराठी चालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. या उद्देशाने परिवहन विभागाच्या सामाजिक बांधिलकीतून राबविलेल्या १०५ दिवसांच्या विशेष उपक्रमाद्वारे राज्यातील सुमारे १ लाख ६५ हजार ८०० रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. हा उपक्रम पुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कामगार नेते शशांक राव तसेच कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी अतिरिक्त मुदत देण्याबाबत मंत्री श्री. सरनाईक म्हणाले की, संबंधित चालकांना एक महिन्याची प्रारंभिक मुदत देण्यात येईल. या कालावधीत चालकांना मराठी शिकण्याची संधी दिली जाईल. त्यानंतरही मराठी भाषा शिकण्यास जाणीवपूर्वक नकार दिल्यास कायद्यानुसार बॅज रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
मुंबई आणि ठाणे परिसरातील वातावरण बिघडविण्याचा काही समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचे सांगून मंत्री सरनाईक यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. रिक्षा-टॅक्सी संघटनांचे पदाधिकारी आणि नेत्यांशी शासन सातत्याने संवाद साधत असून, त्यांच्या सूचनांचा विचार करून कोणावरही चुकीच्या पद्धतीने कारवाई होणार नाही, अशी शासनाची भूमिका असल्याचेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले