MPSC पेपरफुटीचे धागेदोरे आता नंदुरबारमध्ये; आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या मुख्याध्यापकासह ६ जणांना अटक

नंदुरबार : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक (Drug Inspector) पद भरती परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता थेट नंदुरबार जिल्ह्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. या धक्कादायक प्रकरणामध्ये मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने मोठी कारवाई करत नंदुरबारमधील एका नामांकित अकॅडमीच्या संचालकासह ६ जणांना अटक केली आहे.
MPSC पेपरफुटीचे धागेदोरे आता नंदुरबारमध्ये; आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या मुख्याध्यापकासह ६ जणांना अटक

या संपूर्ण कारवाईत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, आपल्या स्वतःच्या मुलीला परीक्षा पास करण्यासाठी चक्क राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’ विजेत्या जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकानेच ५ लाख रुपयांची लाच देऊन हा पेपर फोडल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
नेमकं काय घडलं ?
अन्न आणि औषध प्रशासनातील औषध निरीक्षक (गट-ब) या पदासाठी २२ मार्च २०२६ रोजी एमपीएससीमार्फत चाळणी परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, परीक्षा होण्याच्या दोन दिवस आधीच प्रश्नपत्रिका लीक झाल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर मुंबई गुन्हे शाखेने तात्काळ गुन्हा दाखल करत विशेष तपास चक्र फिरवले.
तपास करत असताना पोलिसांचे धागेदोरे नंदुरबार शहरात असलेल्या कौटिल्य अकॅडमीपर्यंत पोहोचले. या अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील आणि परीक्षेत उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी ऋतुजा पाटील हिचे वडील अमृत पाटील यांच्यामध्ये या पेपरसाठी तब्बल १२ लाख रुपयांचा सौदा ठरला होता, ज्यातील ५ लाख रुपये ॲडव्हान्स म्हणून देण्यात आले होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पोलिसांची नंदुरबारमध्ये धडक कारवाई
मुंबई गुन्हे शाखेचे पथक संशयित मुख्य आरोपी प्रवीण पाटील याला सोबत घेऊन थेट नंदुरबारमध्ये दाखल झाले. पोलिसांनी त्यांच्या कौटिल्य अकॅडमीचा परिसर आणि संबंधित संशयितांच्या निवासस्थानांची सुमारे ४ तास कसून झाडाझडती घेतली. या छाप्यात पोलिसांनी महत्त्वपूर्ण डिजिटल पुरावे आणि काही कागदपत्रे हस्तगत केली आहेत.
आतापर्यंत कोणा-कोणाला झाली अटक ?
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत खालील प्रमुख संशयितांना अटक केली आहे:
विश्वेश्वर नकाते आणि गोपाळ मराठे – एमपीएससीचे सहायक कक्ष अधिकारी
अभिजीत लेंडवे – एमपीएससीचे अवर सचिव
प्रवीण पाटील – संचालक,कौटिल्य अकॅडमी,नंदुरबार
अमृत पाटील – जिल्हा परिषद शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक (आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते) आणि विद्यार्थिनी ऋतुजा पाटीलचे वडील
लोकेश उर्फ गौरव राजेंद्र पाटील – ऋतुजा पाटीलचा मित्र
तसेच, या व्यवहारात मध्यस्थी केल्याच्या संशयावरून नंदुरबारच्याच एका नामांकित शाळेतील क्रीडा शिक्षक मयूर ठाकरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
तपासातील महत्त्वाचे मुद्दे:
१० उत्तरे मुद्दाम चुकवण्याचा कट: मुख्य आरोपी विद्यार्थिनी ऋतुजा पाटील हिला लीक झालेला प्रश्नसंच मिळाल्यानंतर, कोणाला संशय येऊ नये म्हणून तिला परीक्षेत मुद्दाम १० प्रश्नांची उत्तरे चुकीची लिहिण्याची सूचना देण्यात आली होती.
१२ लाखांची डील: ऋतुजाचे वडील अमृत पाटील (जे स्वतः जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते मुख्याध्यापक आहेत) आणि कौटिल्य अकॅडमीचे संचालक यांच्यात १२ लाख रुपयांचा सौदा झाला होता, ज्यापैकी ५ लाख रुपये ॲडव्हान्स देण्यात आले होते.
ब्रेकअपनंतर प्रकरणाचा पर्दाफाश: ऋतुजाने हा लीक झालेला पेपर तिच्या मित्रासोबत (गौरव पाटील) शेअर केला होता. मात्र, नंतरच्या काळात त्यांच्यात झालेल्या वादातून आणि ब्रेकअपनंतर व्हॉट्सॲप चॅट्स समोर आल्यामुळे या संपूर्ण घोटाळ्याचा पर्दाफाश झाला.
ब्रेकअपनंतर फुटलं भांडं !
या केसमध्ये एक वेगळाच वळण पाहायला मिळालं. मिळालेल्या माहितीनुसार, पेपर मिळवून परीक्षा पास झालेल्या ऋतुजाने हा पेपर तिच्या बॉयफ्रेंडसोबत (गौरव) शेअर केला होता. मात्र, नंतरच्या काळात त्यांच्यात झालेल्या वाद आणि ब्रेकअपनंतर या प्रकरणाशी संबंधित चॅट्स आणि पुरावे समोर आले, ज्यामुळे ही कोट्यवधी रुपयांची पेपरफुटी उघडकीस आली.पोलीस सध्या प्रवीण पाटीलचा खराब झालेला मोबाईल दुरुस्त करून त्यातील डेटा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून या पेपरफुटीचा फायदा उत्तर महाराष्ट्रातील आणखी किती विद्यार्थ्यांना झाला आहे, याचा सखोल शोध घेता येईल.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250