
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिन समारंभाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान-सन्मान राखला जावा आणि त्याची विटंबना/अवमान होऊ नये, राष्ट्रध्वजासाठी प्लॅस्टिकचा वापर करण्यास पूर्णपणे बंदी असून, प्लॅस्टिक ध्वज विक्री किंवा वापर करणाऱ्यांवर ध्वज संहितेनुसार थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी एका शासकीय परिपत्रकाद्वारे दिला आहे.
स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त विविध शासकीय, निमशासकीय आणि खाजगी संस्थांमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम पार पडतात. या प्रसंगी नागरिक आणि लहान बालके राष्ट्रध्वजाविषयीचे प्रेम व अभिमान दर्शविण्यासाठी वैयक्तिकरित्या लहान ध्वजांचा वापर करतात. मात्र, शासन नियमांनुसार प्लॅस्टिकच्या ध्वजांचा वापर करण्यास सक्त मनाई असून, जनतेने केवळ लहान कागदी ध्वजांचाच वापर करावा, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. महत्त्वाचे नियम व खबरदारी: राष्ट्रीय समारंभ संपल्यानंतर राष्ट्रध्वज रस्त्यावर वा अन्य ठिकाणी कचऱ्यात अस्ताव्यस्त टाकले जाणार नाहीत, याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी.
राष्ट्रध्वज खराब झाला असल्यास, ध्वज संहितेतील तरतूदींनुसार त्याचा योग्य तो मान राखूनच तो नष्ट करण्याची कारवाई करावी.
जाणीवपूर्वक राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्याचे आढळल्यास ‘राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कायदा 1971’ च्या कलम 2 नुसार कठोर कारवाई केली जाईल. जिल्ह्यातील सर्व महामंडळे, ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा- महाविद्यालये, आरोग्य संस्था आणि पोलीस यंत्रणेच्या मदतीने प्लॅस्टिक ध्वजांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. अशा प्रकारचा प्लॅस्टिक ध्वजांचा वापर आढळल्यास संबंधित विक्रेते व वापरकर्त्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत.















