Home महाराष्ट्र भंडारदरा शताब्दी महोत्सवाचा सर्वंकष आराखडा तयार‌ करा‌ – पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे...

भंडारदरा शताब्दी महोत्सवाचा सर्वंकष आराखडा तयार‌ करा‌ – पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील; शिर्डी विकासात आध्यात्मिक दृष्टिकोन ठेवा

0
Prepare a comprehensive plan for Bhandardara Centenary Festival – Guardian Minister Dr. Radhakrishna Vikhe Patil; Keep a spiritual perspective in Shirdi development

भंडारदरा धरणाच्या शताब्दी वर्षानिमित्त महोत्सवाचा सर्व विभागांनी समन्वयातून सर्वंकष कृती आराखडा तयार करावा, तसेच शिर्डी हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने भाविकांची सोय लक्षात घेऊन आध्यात्मिक दृष्टिकोन ठेवत शिर्डीचा विकास आराखडा तयार करावा, असे निर्देश राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात भंडारदरा, निळवंडे पर्यटन विकास योजना, शिर्डी विकास योजना व सीना नदी विकास प्रकल्पाबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्याप्रसंगी पालकमंत्री डॉ. विखे पाटील बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, मनपा आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय अधिकारी गणेश राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले , भंडारदरा धरणाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शताब्दी महोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. या परिसरात विविध कार्यक्रमांच्या आयोजनाचा बारा महिन्यांचा कार्यक्रम तयार करण्यात यावा. हे करत असताना स्थानिक लोककलांचा यात सहभाग घ्यावा, जेणेकरून स्थानिक लोककलेला वाव मिळण्याबरोबरच रोजगार निर्मितीमध्ये वाढ होण्यास मदत होईल. या ठिकाणी तंबू निवास व्यवस्था, विद्युत रोषणाई यांसारख्या आकर्षक बाबींचा समावेश करावा. परिसरात जागेची कमतरता असल्याने त्याबाबत सुयोग्य नियोजन करावे. वन विभागानेही पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक तो आराखडा तयार करावा.

शिर्डी विकास योजनेबाबत बोलताना श्री.विखे पाटील म्हणाले, शिर्डी येथील साईबाबा हे लाखो लोकांचे श्रद्धास्थान आहे. शिर्डी ही एक आध्यात्मिक नगरी असून या ठिकाणी विकासकामे करताना आध्यात्मिक दृष्टिकोन समोर ठेवत कामांचा आराखडा तयार करावा. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला मनशांती देणाऱ्या ध्यानकेंद्रासारख्या बाबींचा समावेश करण्यात यावा.

शिर्डीमध्ये येणारे रस्ते सुसज्ज करण्याबरोबरच मनाला प्रसन्नता देणारी कारंजी उभारण्यात यावीत. शहरामध्ये वाहनांचे व गर्दीचे नियमन, रस्त्याच्या कडेला उद्याने, आवश्यकतेनुसार प्रसाधनगृहांची उभारणी करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.

या वेळी पालकमंत्र्यांनी हवाई व संरक्षण परिषद (एरोस्पेस व डिफेन्स कॉनक्लेव्ह) तसेच धर्मवीर गडाच्या संवर्धनाबाबतच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला.