अहिल्यानगर- जिल्ह्यात ९ मार्चपासून राबविण्यात येणाऱ्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे. पात्र मुलींना लसीकरणाबाबत अचूक माहिती देऊन मोहिमेत अधिकाधिक सहभागासाठी मोहिमेची व्यापक स्वरुपात जागृती करण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात एचपीव्ही लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हा कार्यबल गट समितीच्या बैठकीत अपर जिल्हाधिकारी श्री.हिंगे बोलत होते.
बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ संदीप पुंड, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राजुरकर, उप शिक्षणाधिकारी आकाश दरेकर यांच्यासह आय.एम.ए., आय.ए.पी, व फोगसी चे प्रतिनिधी उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे म्हणाले, एचपीव्ही लसीकरण ही मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मोहिम आहे. गर्भाशयाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून संरक्षण मिळविण्यासाठी या लसीकरण मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाने शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग, समाजकल्याण तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांशी समन्वय साधून मोहिमेचे काटेकोर नियोजन करावे. शाळांमधील पात्र मुलींची अचूक नोंदणी करून त्यांचे लसीकरण वेळेत पूर्ण करावे. पालकांमध्ये लसीकरणाबाबत कोणताही गैरसमज राहू नये यासाठी व्यापक जनजागृती करावी. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर तसेच आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातून तसेच ग्रामसभेद्वारे गावागावात माहिती पोहोचवावी. लसीकरणाच्या दिवशी आवश्यक मनुष्यबळ, औषधसाठा आणि थंड साखळी (कोल्ड चेन) व्यवस्थापन व्यवस्थित ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
प्रत्येक तालुक्यातील प्रगतीचा नियमित आढावा घ्यावा आणि लसीकरण मोहिमेत कोणतीही अडचण आल्यास ती तात्काळ सोडवावी. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून ही मोहिम अधिक प्रभावीपणे राबवावी, असेही श्री.हिंगे यांनी सांगितले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नागरगोजे म्हणाले, १४ वर्षे पूर्ण केलेल्या व १५ वर्षे पूर्ण न केलेल्या मुलींसाठी HPV लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. एकूण लोकसंख्येच्या सुमारे १ टक्का लाभार्थी अपेक्षित असून त्यांना गार्डासिल-४ या लसीचा एकच डोस देण्यात येईल. ही लस ०.५ मिली इतकी डाव्या दंडाच्या वरच्या भागात स्नायूमध्ये दिली जाईल. लसीकरण सत्र सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत चालेल व सर्व पात्र लाभार्थ्यांची तसेच दिलेल्या लसीची नोंद यू-विन पोर्टलवर केली जाणार आहे. लसीकरणापूर्वी लाभार्थी उपाशी पोटी नसेल याची पालकांनी खात्री करावी. लस देण्याआधी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून लाभार्थीची तपासणी केली जाईल. प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी योग्य व्यवस्थापन करण्यात आले असून लस घेतल्यानंतर लाभार्थीला तीस मिनिटे लसीकरण सत्राच्या ठिकाणी थांबवले जाईल. तरी समाजमाध्यमांद्वारे पसरविण्यात येणाऱ्या चुकीच्या बातम्या वर व अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
बैठकीस सर्व वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
#महाराष्ट्रशासन#GovernmentOfMaharashtra#HPVVaccination#CervicalCancerFreeIndia#GirlChildHealth#AhilyanagarAdministration#PublicHealth#VaccinationDrive2026#UWinPortal#WomenHealth#HealthyMaharashtra#CancerPrevention#AhilyanagarHealth#AwarenessCampaign#आरोग्य_विभाग#जनजागृती
















