मुंबई : कामगारांच्या कष्ट आणि योगदानामुळेच महाराष्ट्राचे वैभव उभे राहिले असून राज्य प्रगतीच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते आज महाराष्ट्राच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र पोलीस दलाच्यावतीने राष्ट्रगान, राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले व राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. ध्वजवंदनास जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शिवनंदा लंगडापुरे, उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे, महेश हरिश्चंद्रे, महादेव किरवले, प्रशांत पानवेकर, भूमी अभिलेख अधीक्षक धनाजी धायगुडे, आणीबाणी काळात कारावास भोगलेले स्वातंत्र्यसेनानी तसेच महसूल अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सुरक्षा रक्षक समीर कोळवणकर, सुरक्षा रक्षक कृष्णात पाटील आणि सुरक्षा पर्यवेक्षक प्रमोद महाले यांचा विशिष्ट सेवेसाठी कामगार विभागामार्फत मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. महिला व बाल विकास विभागामार्फत सन 2020-21 वर्षीचा जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार श्रीमती सीमा देशपांडे यांना, सन 2021-22 चा पुरस्कार शैलजा गंटूक यांना आणि सन 2022-23 चा पुरस्कार श्रीमती कुंदा फाटक यांना देण्यात आला. त्याचप्रमाणे क्रीडा विभागामार्फत सन 2021-22 करिता राही या सामाजिक संस्थेला आणि सन 2024-25 करिता ममता सामाजिक संस्थेला जिल्हा युवा पुरस्कार देण्यात आला. यावेळी विघ्नेश मुरकर यांनाही सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
















