(नंदुरबार) बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक आणि शाश्वत शेती पद्धतींना चालना देण्यासाठी नंदुरबारमध्ये “आपला परिसर, आपले बीज” या अंतर-राज्यीय स्वदेशी बीज प्रदर्शन व कार्यशाळेचे उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. रीड्स (REEDS) संस्थेमार्फत, योजक (YOJAK Center for Strategic Planning in Sustainable Development) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारत सरकारच्या PPV&FRA प्राधिकरणाच्या सहकार्याने आयोजित या दोन दिवसीय संगोष्ठीमध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील शेतकरी, संशोधक आणि बीज संरक्षक सहभागी झाले आहेत.
जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, योजकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गजानन डांगे आणि PPV & FRA प्राधिकरणाच्या पश्चिम विभाग प्रमुख डॉ. सुजाता तेताली यांच्या हस्ते पारंपरिक “बियरा पूजन” करून करण्यात आले.
या प्रदर्शनात तीन राज्यांतील सात जिल्ह्यांमधून संकलित करण्यात आलेल्या ७०० हून अधिक पारंपरिक बियाण्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. तृणधान्ये, डाळी, भाज्या आणि विविध पारंपरिक पिकांच्या दुर्मिळ वाणांचा यात समावेश असून, ही बियाणे कमी पाण्यात, रासायनिक खतांशिवाय आणि बदलत्या हवामानातही उत्तम उत्पादन देण्यास सक्षम असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी या उपक्रमाचे कौतुक करत नंदुरबारमधून पारंपरिक बीजांचे दस्तऐवजीकरण सुरू होणे अभिमानास्पद असल्याचे सांगितले. तसेच शासनाच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
प्रदर्शनात दुर्गम आदिवासी भागांतील पारंपरिक बीज रक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदविला. स्थानिक शेतकऱ्यांकडून थेट बियाण्यांचे वैशिष्ट्य, त्यांचे गुणधर्म आणि पारंपरिक शेतीविषयी माहिती जाणून घेण्याची संधी नागरिकांना उपलब्ध झाली.
स्वदेशी बियाण्यांचा वारसा जतन करून अन्न सुरक्षा, जैवविविधता आणि आत्मनिर्भर शेतीला बळ देण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
#आपलापरिसरआपलेबीज#Nandurbar#SeedFestival#TraditionalSeeds#SustainableFarming#ClimateResilientAgriculture#OrganicFarming#IndigenousSeeds#TribalFarmers#AgroBiodiversity#REEDS#YOJAK#PPVFRA#NaturalFarming#SeedConservation#शाश्वतशेती
















