Home नंदुरबार जिल्हा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवी संधी;मूल्यसाखळी भागीदार म्हणून एफपीसी व सहकारी संस्थांकडून अर्ज मागविले

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवी संधी;मूल्यसाखळी भागीदार म्हणून एफपीसी व सहकारी संस्थांकडून अर्ज मागविले

0
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवी संधी;मूल्यसाखळी भागीदार म्हणून एफपीसी व सहकारी संस्थांकडून अर्ज मागविले
New opportunity for soybean farmers; applications invited from FPCs and cooperative societies to act as value chain partners.

(नंदुरबार) राष्ट्रीय खाद्य तेल अभियान (तेलबिया) सन 2026-27 अंतर्गत सोयाबीन पिकासाठी नंदुरबार जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पिकनिहाय मूल्यसाखळी भागीदार (व्हॅल्यू चेन पार्टनर) यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात प्रमाणित दर्जाचे बियाणे वितरण करण्यात येणार असून, त्यासाठी इच्छुक शेतकरी उत्पादक कंपन्या (FPC) आणि सहकारी संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या एफपीसी किंवा सहकारी संस्थांची मूल्यसाखळी भागीदार म्हणून निवड केली जाणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी कळवले आहे.

या योजनेत सहभागी होण्यासाठी संबंधित कंपनी किंवा संस्था कायद्याअंतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. ज्या जिल्ह्यात बियाणे उत्पादनाचे काम केले जाणार आहे, त्या क्षेत्रातील किमान तीन वर्षांचा अनुभव असावा. हा अनुभव 2023 पूर्वीचा असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित एफपीसी किंवा सहकारी संस्थेमध्ये किमान 200 शेतकरी सदस्य नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे.

सहकारी संस्था असल्यास तिच्या उपविधीत तेलबिया पिकांशी संबंधित कामकाजाचा स्पष्ट उल्लेख असावा. मागील तीन वर्षांतील सरासरी वार्षिक उलाढाल किमान 1 लाख रुपयांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये शेतकऱ्यांचा किमान 3 लाख रुपयांचा सहभाग असावा. तसेच संबंधित एफपीसी किंवा सहकारी संस्था प्राधान्याने कमी उत्पादकता असलेल्या तालुक्यांमध्ये कार्यरत असावी.

शासनाकडून पूर्वी अनुदान प्राप्त झालेल्या शेतकरी उत्पादक संघटनांना या योजनेत प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच 10 हजार शेतकरी उत्पादक संघ (FPO) योजनेअंतर्गत तयार झालेल्या एफपीसी, नाफेड (NAFED), एनएससी (NSC) आणि इतर सार्वजनिक नोंदणीकृत तेलबियांसंबंधित शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही पात्रता निकषांच्या अधीन राहून प्राधान्य दिले जाणार आहे.

निवड झालेल्या मूल्यसाखळी भागीदारांना बियाणे वितरण आणि प्रशिक्षणासाठी झालेल्या एकूण खर्चाच्या 4.5 टक्के रकमेइतके व्यवस्थापन सहाय्य देण्यात येणार आहे. मात्र, वितरित केलेल्या बियाण्यांची यशस्वी पेरणी झाल्यानंतरच हे व्यवस्थापन सहाय्य वितरित करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

इच्छुक शेतकरी उत्पादक कंपन्या आणि सहकारी संस्थांनी सोयाबीन पिकासाठी स्वारस्यपत्रासह आवश्यक कागदपत्रे निर्धारित नमुन्यात सादर करावीत. अर्ज संबंधित कंपनीच्या लेटरहेडवर संचालक मंडळाच्या ठरावासह सादर करणे आवश्यक आहे. अर्जाचा नमुना संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून उपलब्ध होणार आहे.

इच्छुक संस्थांनी 16 जून 2026 पर्यंत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नंदुरबार यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, तालुका बीज गुणन केंद्र, धुळे रोड, नंदुरबार येथे संपर्क साधावा. तसेच दूरध्वनी क्रमांक 02564-295405 किंवा dsaondb@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधता येईल.

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, तांत्रिक मार्गदर्शन आणि मूल्यवर्धनाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार असून, पात्र एफपीसी व सहकारी संस्थांनी या संधीचा लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here