Home महाराष्ट्र ‘टेन्शन घ्यायचं नाही, बिंधास्त अभ्यास करा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागवल्या पालिकेच्या शाळेतील आठवणी

‘टेन्शन घ्यायचं नाही, बिंधास्त अभ्यास करा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागवल्या पालिकेच्या शाळेतील आठवणी

0
‘टेन्शन घ्यायचं नाही, बिंधास्त अभ्यास करा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागवल्या पालिकेच्या शाळेतील आठवणी
"Don't stress—study without a worry!" Deputy Chief Minister Eknath Shinde recalls memories of his municipal school days.

ठाणे:-“नवीन वर्गात आल्यावर मनात शिक्षणाची किंवा वातावरणाची कोणतीही भीती बाळगू नका. ‘टेन्शन गया पेन्शन देनेको’ असे समजा आणि कोणत्याही दडपणाशिवाय बिंधास्तपणे अभ्यास करा. तुमची जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनतच तुम्हाला आयुष्यात उत्तुंग यश मिळवून देईल,” असा मोलाचा आणि आश्वासक सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

उन्हाळ्याची मोठी सुट्टी संपल्यानंतर आज ठाणे महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये ‘शाळा प्रवेशोत्सव‘ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. किसननगर येथील पालिका शाळा क्रमांक २३ मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवा कोरा गणवेश, हातात पुस्तके आणि गुलाबपुष्प देऊन बालचमूला शालेय प्रवासाच्या पहिल्या दिवशी अनोखी पावती देण्यात आली.

या दिमाखदार सोहळ्याला ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेवक राम रेपाळे, नगरसेविका संध्या मोरे, सुखदा मोरे, एकता भोईर, डॉ. दर्शना भोईर, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, शिक्षणाधिकारी शेषराव बढे आणि मुख्याध्यापक दीपक मोराणकर यांच्यासह ठाण्यातील अनेक लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, शिक्षक, पालक व बालचमू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, वाढत्या स्पर्धेच्या युगात सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांनी मनात अजिबात न्यूनगंड बाळगू नये. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, थोर शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम ही मोठी व्यक्तिमत्त्वे सरकारी आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमधूनच शिकून पुढे आली आहेत. शाळेची इमारत वातानुकूलित असण्यापेक्षा किंवा तिथली फी जास्त असण्यापेक्षा तिथे दिले जाणारे शिक्षण आणि शिक्षकांची बांधिलकी सर्वात महत्त्वाची असते, असे मत त्यांनी मांडले. केवळ पुस्तकी ज्ञानावर भर न देता मुलांचा बौद्धिक, सामाजिक, मानसिक आणि शारीरिक विकास होणे गरजेचे असून, मैदानी खेळ आणि विविध स्पर्धांच्या माध्यमातून शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर शिस्त व संस्कार घडवावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच, मातृभाषेतील शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची आकलन क्षमता अधिक वाढते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

या सोहळ्यादरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. मी देखील याच किसननगर येथील शाळा क्रमांक २३ चा माजी विद्यार्थी असून मला या शाळेचा सार्थ अभिमान आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. पूर्वी ही शाळा एका चाळीसारखी होती, ज्याला दरवाजेही नव्हते. आम्ही स्वतः वर्गाची साफसफाई करून तिथे अभ्यासाला बसायचो, पण त्या वेळचा आनंद काही वेगळाच होता, अशी आठवण त्यांनी सांगितली. आपल्या जुन्या गुरुजनांचे आभार मानताना त्यांनी रघुनाथ परमगुरुजी, निकम सर, पाठक सर, राणे गुरुजी आणि राऊत बाई अशा सर्व शिक्षकांची नावे आदराने घेतली. महापालिकेच्या शाळेत शिकलेली मुले आज राज्याच्या सर्वोच्च पदांवर काम करत आहेत, याचे उत्तम उदाहरण स्वतः मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेला हा तुमचा ‘बापूसो’ म्हणजेच मी स्वतः तुमच्या समोर उभा आहे, असे सांगताच विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली.

शिक्षकांच्या खांद्यावर देशाचे भवितव्य घडवण्याची मोठी जबाबदारी असल्याचे अधोरेखित करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या सुप्रसिद्ध विधानाचा दाखला दिला. वकिलाची, इंजिनिअरची किंवा डॉक्टरची चूक एका मर्यादेपर्यंत लपून राहू शकते, परंतु शिक्षकाने केलेली एक चूक संपूर्ण समाजात आणि देशात पिढ्यानपिढ्या प्रतिबिंबित होते, त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी अत्यंत संवेदनशील आहे. राज्य सरकारने विद्यार्थ्यांवरील दप्तराचे ओझे कमी केले असून शालेय पोषण आहारातही मोठ्या सुधारणा केल्या आहेत, असे सांगत त्यांनी शिक्षकांना पहिल्या बेंचपासून शेवटच्या बेंचवरील प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष देण्याची सूचना केली. नाशिकमधील एका जिल्हा परिषद शाळेचा दाखला देत, तिथली मुले दोन्ही हातांनी इंग्रजी व मराठी लिहीत होती आणि त्यांना ३०० पर्यंत पाढे तोंडपाठ होते, असा अनुभव सांगून शिक्षकांनी बदलत्या काळानुसार स्वतः ‘टेक्नोसॅव्ही’ होऊन विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील ज्ञान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

शाळेचे वातावरण प्रसन्न आणि आरोग्यदायी असण्यावर भर देत उपमुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना कडक निर्देश दिले. शहरातील महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये ‘व्हिजिलन्स स्कॉड‘ (सतर्कता पथक) पाठवून तिथली स्वच्छता, पिण्याचे शुद्ध पाणी आणि स्वच्छतागृहांची पाहणी करण्यात यावी आणि कुठेही त्रुटी आढळल्यास त्या तात्काळ दूर कराव्यात, अशी सूचना त्यांनी केली. विद्यार्थ्यांच्या सुखसोयींसाठी आणि शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. भाषणाचा शेवट करताना त्यांनी, “उडान भरनी है, तो परों को मजबूत करो, सपने देखने से पहले आँखों को जागृत करो, राह में कांटे है तो क्या डरना, फूलों की मांग के लिए मेहनत तो करो…” या प्रेरक ओळी सादर करत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आणि शिक्षकांना भावी पिढी घडवण्यासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here