चंद्रपूर : देशाचे प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी १ जुलै २०१७ पासून देशात वस्तु व सेवा कर (जीएसटी) ही एकच करप्रणाली लागू केली आहे. या सुलभ कर पध्दतीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत भर पडत असून आज चंद्रपूर येथे वस्तु व सेवा कर विभागाच्या उत्तम इमारतीचे लोकार्पण होत आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले.
वस्तु व सेवा कर नुतन इमारतीचे लोकार्पण करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲङ आशिष जयस्वाल, चंद्रपूर शहराच्या महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, करण देवतळे, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, अपर राज्यकर आयुक्त विजय डांगे, राज्यकर सहआयुक्त विनोद गवई आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था भक्कम होत असून आपले राज्य पुढे जात आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार होते, मात्र मुंबईमध्ये महत्वाच्या बैठका असल्यामुळे राज्य शासनाच्या वतीने मी आणि राज्यमंत्री ॲङ शेलार येथे उपस्थित आहोत. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या दूरदृष्टीमुळे चंद्रपूर येथे वस्तु व सेवा कर विभागाची उत्तम इमारत तयार झाली, असेही त्यांनी सांगितले.
देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासात चंद्रपूरचे योगदान मोलाचे – वित्त राज्यमंत्री ॲड. जयस्वाल
चंद्रपूर हा उद्योग आणि वनसंपदेने नटलेला तसेच आर्थिकदृष्ट्या संपन्न जिल्हा आहे. या जिल्ह्याने नेहमीच सरकारच्या तिजोरीकरिता चांगले उत्पन्न दिले आहे. त्यामुळे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासात चंद्रपूरचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे, असे वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी ‘विकसित भारत – २०४७’ चा रोडमॅप तयार केला असून, यात आपल्या राज्याचे महत्त्वाचे योगदान राहणार आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे आता विकासाच्या मार्गावर अग्रेसर आहेत. गडचिरोलीचे उत्पन्न पहिल्या पाच जिल्ह्यांत आणण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प आहे. या इमारतीचे उत्कृष्ट बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने केले असून, त्यासाठी ते अभिनंदनास पात्र आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
महसूल लक्षांक पूर्ततेत चंद्रपूर जिल्हा राज्यात द्वितीय क्रमांकावर
प्रास्ताविकात राज्यकर सहआयुक्त विनोद गवई यांनी माहिती दिली की, सदर इमारत चार मजली असून या इमारतीच्या बांधकामासाठी एकूण २९ कोटी ९९ लक्ष ८० हजार रुपये खर्च झाले आहेत. ही इमारत चंद्रपूर विभागाचे मुख्यालय असून या अंतर्गत चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली हे तीन जिल्हे येतात. आर्थिक वर्ष २०२५-२६ या कालावधीत चंद्रपूर विभागाने सुमारे १४५० कोटी रुपयांचा जीएसटी महसूल गोळा केला आहे. लक्षांक पूर्ततेच्या टक्केवारीत १२२ टक्के कामगिरी करत चंद्रपूर जिल्ह्याने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
तत्पूर्वी, मान्यवरांच्या हस्ते नूतन इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. तसेच फित कापून सर्व मान्यवरांनी इमारतीची पाहणी केली. कार्यक्रमाचे संचालन दिनेश मासोदकर आणि ऐश्वर्या भालेराव यांनी केले. या सोहळ्याला राज्यकर सहआयुक्त संजय पवार, प्रशांत पाटील, संजय सायगण, सहाय्यक राज्यकर आयुक्त तेजराम मडावी, भूषण शहाणे, संतोष हेमणे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
















