(नंदुरबार) :- जिल्ह्यतील नंदुरबार विभागीय पथकाच्या अधिपत्याखालील विविध सिंचन प्रकल्पाच्या अधिसूचित नदी, नाल्यांच्या पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना खरीपातील हंगामी पिकांसाठी व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी पाणी अर्ज करावेत, असे आवाहन नंदुरबार मध्यम प्रकल्पाच्या विभागीय पथकाचे उपकार्यकारी अभियंता अ. कै. मालसे यांनी केले आहे. (खरीप हंगाम पाणी अर्ज)
अन्नधान्य, चारा, डाळी, कपाशी, भुईमुग व इतर हंगामी पिकांसाठी पाणी अर्ज सादर करावेत
शिवण मध्यम प्रकल्प (ता.नंदुरबार), कोरडी मध्यम प्रकल्प (ता.नवापूर),ल.पा.योजना रंकानाला (ता.नंदुरबार) व ल.पा.योजना मेंदीपाडा (ता.नवापूर) अंतर्गत अधिसूचीत नदी/नाले यांच्या पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बागायतदारांनी १४ ऑक्टोबर २०२३ पर्यंतच्या लाभासाठी सुरू झालेल्या २०२३-२४ खरीप हंगामात भुसार, अन्नधान्य, चारा, डाळी, कपाशी, भुईमुग व इतर हंगामी पिकांसाठी पाणी अर्ज सादर करावेत. पाण्याच्या उपलब्धतेनुसार या अर्जांना मंजुरी देण्यात येणार आहे. बागायतदारांनी आपले नमुना नं.७, ७(अ), ७(ब) चे पाणी अर्ज संमतीपत्रकासह संबंधीत विभागीय कार्यालयात अर्ज ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत सायंकाळी ०५ .४५ वाजेपर्यंत देणेबाबतही श्री. मालसे यांनी कळविले आहे.
या असतील अटी व शर्ती
पाण्याच्या उपलब्धतेनुसार मंजुरी देण्यात येईल .
बागायतदारांनी आपआपल्या शेतचाऱ्या स्वच्छ व सुस्थितीत ठेवाव्यात.
पाणी अर्ज स्विकारण्याची पुरेशी मुदत देण्यात आलेली आहे . मुदतीनंतर आलेल्या पाणी अर्जांच्या मंजूरी बाबत उपलब्ध पाणीसाठा व आगोदर आलेली मागणी विचारात घेवून नंतरच मंजुरी वा नामंजुरी चा विचार करण्यात येईल.
अन्नधान्ये,भुसार,चारा पिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल .
पाण्याचा रितसर पास मिळाल्याशिवाय पाणी घेऊ नये.
थकबाकीदारांनी मागील संपूर्ण थकबाकी व दरसाल दर शेकडा १० टक्के जादा आकारासह भरणे आवश्यक आहे.
टंचाई परिस्थितीत ऐन हंगामात पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा लागल्यास पिक नुकसान भरपाई देता येणार नाही.
नमुद केलेल्या विहीत दिनांकपर्यंत पाणी अर्ज उपविभागीय कार्यालयास देऊन पोहोच पावती घेतली पाहिजे.
शासनाने काही अधिकच्या सवलती दिल्यास त्यास जाहिर प्रकटनाद्वारे प्रसिद्धी देण्यात येईल .
हस्तांतर झालेल्या पाणी वापर संस्थाना घनमापन पद्धतीने पाणी देण्यात येईल.
तर होणार कारवाई…
पाणी नाश,पाळी नसतांना पाणी घेणे, मंजुरीपेक्षा अधिक क्षेत्र भिजवणे,विहिरीवरील पिकास कालव्याचे पाणी घेणे व पाटमोट संबंध दूर न करणे वगैरे गुन्हे करणाऱ्या बागायतदरांचे नियमानुसार पंचनामे करण्यात येतील व दंडाचे दराने आकारणी करण्यात येईल. तसेच लाभक्षेत्रातील तसेच कालव्यापासून ३५ मीटर अंतराच्या हद्दीतील विहरी बाबत नमुना ७ ( ब ) मागणी अर्ज न करता बिन अर्जी क्षेत्र भिजविण्यात आल्यास अशा प्रकारचे पंचनामे करण्यात येतील व नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही उपकार्यकारी अभियंता अ. कै.मालसे यांनी कळवले आहे.