
(नंदुरबार) महसूल विषयक अडचणींचा त्वरित निपटारा करून शासनाच्या विविध सेवा नागरिकांपर्यंत एकाच ठिकाणी पोहोचविण्याच्या उद्देशाने नंदुरबार जिल्ह्यात २२ व २३ जुलै २०२६ रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये आयोजित या विशेष शिबिरांचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे.
महसूल व वन विभागाच्या पुढाकारातून राज्यभर ही मोहीम राबविण्यात येत असून, नागरिकांच्या महसूल विषयक तक्रारी, प्रलंबित अर्ज व विविध सेवांचा निपटारा एकाच ठिकाणी करण्यावर भर देण्यात आला आहे. शेतकरी, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही शिबिरे विशेष उपयुक्त ठरणार आहेत.
डॉ. सेठी यांनी सांगितले की, शिबिरांमध्ये महसूल विभागाशी संबंधित विविध सेवांसह मार्गदर्शन, तक्रार निवारण आणि अर्जांची तत्काळ छाननी व निकाली काढण्याची सुविधा उपलब्ध असेल. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहितीही नागरिकांना दिली जाणार आहे.
याशिवाय शासनाने महसूल विभागात केलेल्या महत्त्वपूर्ण सुधारणांची माहितीही नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. अकृषक रूपांतरण प्रक्रियेतील सुलभीकरण, सनद प्रणालीतील सुधारणा, एकरकमी अभिप्राय भरण्याची सुविधा, तुकडेबंदी कायद्यातील सुधारणा तसेच अभिलेखांच्या आधुनिकीकरणाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
शिबिरांचे वेळापत्रक
दि. २२ जुलै २०२६
* अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ : कोकणी माता मंदिर सभागृह, सरोपाडा
* शहादा विधानसभा मतदारसंघ : मीरा प्रताप लॉन्स, शहादा
* नंदुरबार विधानसभा मतदारसंघ : श्री गजानन महाराज मंदिर सभागृह, नंदुरबार
दि. २३ जुलै २०२६
* नवापूर विधानसभा मतदारसंघ: स्व. गुरुप्रसिंग नाईक टाऊन हॉल, नगरपरिषद, नवापूर
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी नागरिकांना आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शिबिरात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. महसूल विषयक प्रलंबित प्रश्न, तक्रारी व विविध सेवांचा लाभ या शिबिरांमधून सहज उपलब्ध होणार असल्याने या लोकाभिमुख उपक्रमाचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.















