(नंदुरबार) जमाबंदी आयुक्त कार्यालय (पुणे) यांनी ‘ई-हक्क’ नावाने नविन ऑनलाईन आज्ञावली विकसित केली असून सातबारा व जमीनीवरील विविध प्रकारच्या नोंदींसाठी या प्रणालीद्वारे अर्ज दाखल करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी केले आहे.
तलाठ्यांकडे न जाता या प्रणालीवर अर्ज दाखल करता येईल
या आज्ञावलीमध्ये अधिकार अभिलेखात आवश्यक त्या नोंदी गाव नमुना सातबारावर दाखल होण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार प्रतिवृत्त देण्यासाठी जो अर्ज करावा लागतो तो अर्ज तलाठी कार्यालयात न जाता घरी बसून हक्क प्रणालीद्वारे दाखल करता येण्याची सुविधा दिलेली आहे. तसेच याद्वारे सातबारा उताऱ्यावर अनोंदणीकृत नोंदी वारस नोंदी, मयताचे नाव कमी करणे, कर्जाचा बोजा कमी करणे, कर्जाचा बोजा चढविणे, अज्ञान पालनकर्ता शेरा कमी करणे, विश्वस्तांचे नाव बदलणे, एकत्र कुटूंब कर्त्यांची नोंद कमी करणे, सातबारा उताऱ्यातील चुका दुरुस्त करणे यासह इतर महत्वाच्या कामासाठी अर्ज दाखल करण्यासाठी ‘ई हक्क’ प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. सद्यस्थितीत फेरफार नोंदीसाठी तलाठ्यांकडे अर्ज दाखल करावा लागतो. तथापि, आता तलाठ्यांकडे न जाता या प्रणालीवर अर्ज दाखल करता येईल.
![Manisha Khatri IAS](https://nandurbarnews.in/wp-content/uploads/2023/08/Manisha-Khatri-IAS-Photo-1024x576.png)
संकेतस्थळावर आपले खाते तयार करणे आवश्यक
पहिल्या टप्प्यात ई-करार बोजा दाखल करणे, अनोंदणीकृत नोंदी वारस नोंदी, मयताचे नाव कमी करणे, कर्जाचा बोजा कमी करणे, कर्जाचा बोजा चढविणे, अज्ञान पालनकर्ता शेरा कमी करणे, विश्वस्तांचे नाव बदलणे, एकत्र कुटूंब कर्त्यांची नोंद कमी करणे, सातबारा उताऱ्यातील चुका दुरुस्ती फेरफार या प्रकारांसाठी खातेदार यांना या प्रणालीमधून अर्ज करता येणार आहे. यासाठी राष्ट्रीयकृत बँका, सहकारी सोसायटी व नागरिक यांना अर्ज करण्यासाठी https://pdeigr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर आपले खाते तयार करणे आवश्यक आहे असेही प्रसिध्दी पत्रकानुसार कळविण्यात आले आहे.