Home सरकारी योजना अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी; कामे वेगाने व...

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी; कामे वेगाने व दर्जेदार करावीत – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

0
Administrative approval granted for development works at Ajinkyatara Fort and Sangam Mahuli; works must be executed swiftly and with high quality – Public Works Minister Shivendrasinhraje Bhosale.

सातारा: अजिंक्यतारा किल्ल्याचे जतन, संवर्धन व परिसर सुशोभीकरणासाठी 134.80 कोटी आणि संगम माहुली येथील महाराणी ताराबाई, महाराणी येसुबाई व छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाचे संवर्धन, जीर्णोद्धार तसेच जमीन विकसित करण्याच्या  132.95 कोटींच्या कामास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. ही दोन्ही कामे वेगाने करण्यासोबतच त्यांची गुणवत्ता उत्तम राखावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.

अजिंक्यतारा किल्ल्याचे जतन व संवर्धन, परिसर सुशोभीकरण आणि संगम माहुली येथील महाराणी ताराबाई,महाराणी येसुबाई व छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळांचे संवर्धन, जीर्णोद्धार आणि जमिन विकसित करण्याचा कामाचा आढावा सार्वजनिक बांधकाम मंत्री  श्री. भोसले यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, नगराध्यक्ष अमोल मोहिते, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विश्वास सातपुते, पुरातत्व विभागाचे सहसंचालक डॉ. विलास वाहने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

अजिंक्यतारा किल्ल्याचे जतन-संवर्धन आणि संगम माहुली येथील विकासकामांच्या बांधकाम कामांची निविदा एकत्रित काढावी, अशा सूचना देऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भोसले म्हणाले, अजिंक्यतारा किल्ला संवर्धन कामात विविध ठिकाणी  पायवाटा तयार करण्यात येणार आहेत. रात्रीच्या वेळी किल्ल्यावर वन्य प्राण्यांचा वावर असतो, त्यामुळे प्रकाश केवळ पायवाटांवर पडेल अशा स्वरूपाचे दिवे बसवावेत. संवर्धनाच्या कामातून निधी शिल्लक राहिल्यास खिंडीतील गणपती’ मंदिरापासून अजिंक्यतारा किल्ल्यापर्यंत पायवाट तयार करावी. तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष अजिंक्यतारा किल्ल्याची पाहणी करावी.

संगम माहुली येथील कामाचा आढावा घेताना सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भोसले म्हणाले, संगम माहुलीच्या प्रवेशद्वारापासून गावापर्यंतचा रस्ता काँक्रीटचा करावा व रस्त्याची रुंदी वाढवावी. यासाठी स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊन चर्चा करावी. तसेच संगम माहुली येथे पार्किंग व्यवस्थेसह गावातील सर्व गटारे बंदिस्त करावीत. प्रवेशद्वारावरील कमान आकर्षक नवीन डिझाइननुसार नव्याने उभी करावी.

अजिंक्यतारा किल्ला आणि संगम माहुली येथील कामे करताना गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करू नका. ही दोन्ही कामे सातारा शहरातील नागरिकांच्या कायम स्मरणात राहतील अशा उत्कृष्ट दर्जाची करावीत, अशा सूचनाही सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भोसले यांनी यावेळी दिल्या.