Home नंदुरबार जिल्हा खांडबारा येथे अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई;38 लिटर बेकायदेशीर ताडी जप्त...

खांडबारा येथे अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई;38 लिटर बेकायदेशीर ताडी जप्त करून केली नष्ट!

0
Major crackdown by the Food and Drug Administration at Khandbara; 38 liters of illegal toddy seized and destroyed!

(नंदुरबार) अन्न व औषध प्रशासनाने (FDA) नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे अन्न विक्री करणाऱ्या आस्थापनांची अचानक सखोल तपासणी केली. या कारवाईदरम्यान एका पेढीमध्ये अनधिकृतपणे ताडी विक्री केली जात असल्याचे उघडकीस आले. अस्वच्छ परिसर आणि अन्न परवाना किंवा नोंदणी न करता ही विक्री केली जात असल्याने प्रशासनाने कठोर पाऊल उचलत 38 लिटर ताडी जप्त करून ती जागेवरच नष्ट केली. असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त (अन्न) सपना गोडसे पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

खांडबारा परिसरातील विविध अन्न आस्थापनांची तपासणी सुरू असताना एका विक्रेत्याकडे अन्न सुरक्षा व मानके कायदा (Food Safety and Standards Act, 2006) अंतर्गत आवश्यक असलेला परवाना किंवा अधिकृत नोंदणी आढळली नाही. तसेच ताडी विक्रीचे ठिकाण अत्यंत अस्वच्छ स्थितीत होते. या गंभीर उल्लंघनाची दखल घेत अधिकाऱ्यांनी अंदाजे 2 हजार 280 रुपये मूल्याची 38 लिटर ताडी तात्काळ नष्ट केली. संबंधित दोषी विक्रेत्यावर कायद्यातील नियमांनुसार पुढील कठोर कायदेशीर कारवाई केली जात आहे.

“जनतेच्या आरोग्याशी खेळ अजिबात सहन केला जाणार नाही! अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्या किंवा अस्वच्छतेत विनापरवाना खाद्यपदार्थ/पेये विकणाऱ्यांविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल.”

– तुकाराम मुंढे (भा.प्र.से.), आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य

सदर कारवाई अन्न व औषध प्रशासन (महाराष्ट्र राज्य) चे आयुक्त तुकाराम मुंढे (भा.प्र.से.), नाशिक विभागाचे सह-आयुक्त मंगेश माने तसेच नंदुरबार कार्यालयाच्या सहायक आयुक्त श्रीमती सपना गोडसे पाटील यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी सुरेंद्र डौले यांनी पार पाडली.

“नागरिकांना शुद्ध व दर्जेदार अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे आणि तो मिळवून देणे हे प्रशासनाचे आद्य कर्तव्य आहे. अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत किंवा अस्वच्छतेबाबत शंका असल्यास नागरिकांनी निसंकोचपणे अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा. तक्रार करताना आपले नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि संबंधित आस्थापनेचा अचूक पत्ता नमूद करावा,” असेही आवाहन सहायक आयुक्त श्रीमती सपना गोडसे पाटील यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.