
(नंदुरबार) स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मनात देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रध्वजाविषयीचा सन्मान अधिक दृढ करण्यासाठी दि. 9 ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. यंदाचे अभियान राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या 150 वर्षपूर्तीला समर्पित असून, अभियान कालावधीत जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर विविध देशभक्तिपर उपक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
अभियानाची रूपरेषा स्पष्ट करताना सौ. संघवी म्हणाल्या की, अभियानांतर्गत शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक उपक्रम, सामाजिक संस्था, युवक मंडळे तसेच नागरिकांचा व्यापक सहभाग घेण्यात येणार आहे. आयोजित कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन करण्यास प्रोत्साहन देण्यात आले असून, गायन करताना केंद्रीय गृह मंत्रालयाने निश्चित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे. ‘वंदे मातरम्’ची अधिकृत गीतरचना, सामूहिक गायनाचे व्हिडिओ आणि ऑनलाइन प्रशिक्षण सामग्री https://www.vandemataram150.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तिरंगा रॅलीतून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
तिरंगा रॅलीबाबत माहिती देताना सौ. संघवी यांनी सांगितले की, अभियानादरम्यान जिल्हा मुख्यालयापासून ग्रामपंचायत स्तरापर्यंत तिरंगा पदयात्रा, मोटरसायकल, सायकल आणि ई-बाईक रॅली आयोजित करता येणार आहेत. या रॅलींमध्ये विद्यार्थी, युवक, शासकीय अधिकारी-कर्मचारी, पोलीस दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे जवान, क्रीडा संस्था, युवक मंडळे आणि विविध सामाजिक संघटनांना सहभागी करून घेण्यात येणार आहे.
रॅलींचे मार्ग स्थानिक ऐतिहासिक स्थळे, स्वातंत्र्यसैनिकांची स्मारके, महत्त्वाची सार्वजनिक ठिकाणे आणि निर्धारित सेल्फी पॉइंट्सवरून निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रॅलीच्या प्रारंभी ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन करता येईल. सहभागी नागरिकांची सुरक्षितता, वाहतुकीची शिस्त आणि दैनंदिन वाहतुकीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन पोलीस व वाहतूक यंत्रणांच्या समन्वयाने मार्गनियोजन करण्यात यावे. रॅलीदरम्यान भारतीय ध्वजसंहितेचे पालन करणे बंधनकारक राहणार असल्याचे सौ. संघवी यांनी स्पष्ट केले.
तिरंगा आणि ‘वंदे मातरम्’ विषयक प्रदर्शने
सौ. संघवी यांनी पुढे सांगितले की, राष्ट्रीय ध्वजाची उत्क्रांती, त्याचे ऐतिहासिक महत्त्व, भारतीय स्वातंत्र्यलढा आणि स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘तिरंगा आणि वंदे मातरम्’ विषयक प्रदर्शने आयोजित करण्यात येणार आहेत. शाळा, महाविद्यालये, ग्रंथालये, सभागृहे, रेल्वेस्थानके, बसस्थानके, उद्याने, बाजारपेठा, व्यापारी संकुले आणि नागरिकांची वर्दळ असलेल्या सार्वजनिक ठिकाणी ही प्रदर्शने भरविता येतील.
शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना प्रदर्शन मार्गदर्शक म्हणून सहभागी करून राष्ट्रीय ध्वज, ‘वंदे मातरम्’ आणि स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास अभ्यागतांना समजावून सांगण्यास प्रोत्साहित करण्यात येणार आहे. पालक, स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था आणि विविध समुदायांना ही प्रदर्शने पाहण्यासाठी आमंत्रित करून अभियानाचा शैक्षणिक व सामाजिक विस्तार करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सौ. संघवी यांनी सांगितले.
‘सेल्फी विथ तिरंगा’ उपक्रम
डिजिटल उपक्रमाबाबत माहिती देताना सौ. संघवी म्हणाल्या की, ‘सेल्फी विथ तिरंगा’ हा अभियानातील प्रमुख डिजिटल उपक्रम असणार आहे. नागरिकांनी राष्ट्रध्वजासोबत सेल्फी काढून तो https://harghartiranga.com या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करावा. यंदा ‘वंदे मातरम्’च्या 150 वर्षपूर्तीनिमित्त अपलोड केलेल्या सेल्फीमध्ये ‘वंदे मातरम्’च्या ओळींचा समावेश असलेला विशेष व्हिडिओ नागरिकांना डाउनलोड करता येणार आहे.
प्रत्यक्ष कार्यक्रमांतील सूत्रसंचालकांनी उपस्थितांना सेल्फी काढून अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी प्रोत्साहित करावे. स्थानिक रेडिओ, समाजमाध्यमे आणि अन्य प्रसिद्धी माध्यमांद्वारे या उपक्रमाची व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे सौ. संघवी यांनी नमूद केले.
शासकीय व सार्वजनिक वास्तूंवर तिरंगी रोषणाई
अभियानाच्या कालावधीत शासकीय इमारती, रुग्णालये, शाळा-महाविद्यालये, पूल, धरणे, बसस्थानके, रेल्वेस्थानके, प्रमुख रस्ते, चौक, बाजारपेठा आणि अन्य महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी तिरंगी रोषणाई व सजावट करण्यास प्रोत्साहन देण्यात आले आहे. ‘वंदे मातरम्’च्या संकल्पनेवर आधारित भव्य तिरंगी रांगोळ्याही काढण्यात येणार आहेत. या उपक्रमांमध्ये विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक समुदायांना सहभागी करून घेता येईल, अशी माहिती सौ. संघवी यांनी दिली.
राष्ट्रध्वजाची उपलब्धता आणि ध्वजसंहितेचे पालन
सौ. संघवी यांनी सांगितले की, स्थानिक लोकसंख्या आणि मागणीचा अंदाज घेऊन आवश्यक राष्ट्रध्वज उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात यावे. राष्ट्रध्वजांची खरेदी महिला बचतगट किंवा स्थानिक विक्रेत्यांच्या माध्यमातून करता येईल. बचतगटांमार्फत राष्ट्रध्वज विक्री केंद्रेही सुरू करता येणार आहेत. अभियानात वापरण्यात येणारा प्रत्येक राष्ट्रध्वज भारतीय ध्वजसंहितेतील निकषांनुसार असणे आवश्यक आहे. राष्ट्रध्वजाचा वापर, प्रदर्शन आणि जतन करताना त्याचा सन्मान अबाधित राखण्याचे आवाहनही त्यांनी केले.
14 ऑगस्टला ‘विभाजन विभीषिका स्मृती दिन’
‘विभाजन विभीषिका स्मृती दिना’बाबत माहिती देताना सौ. संघवी म्हणाल्या की, भारताच्या फाळणीच्या काळात लाखो नागरिकांनी अनुभवलेल्या वेदना, विस्थापन, संघर्ष आणि त्यागाचे स्मरण करण्यासाठी दि. 14 ऑगस्ट 2026 रोजी ‘विभाजन विभीषिका स्मृती दिन’ पाळण्यात येणार आहे. विशेषतः तरुण पिढीला फाळणीच्या दुःखद वास्तवाची जाणीव करून देणे आणि त्यातून सावरलेल्या लाखो नागरिकांच्या धैर्य व त्यागाला अभिवादन करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या दिनानिमित्त संवेदनशीलता आणि कार्यक्रमाचे गांभीर्य लक्षात घेऊन कार्यक्रमस्थळाची प्रामुख्याने पांढऱ्या रंगात व पांढऱ्या फुलांनी सजावट करावी. कार्यक्रमात दोन मिनिटांचे मौन पाळून फाळणीतील पीडितांना आदरांजली अर्पण करण्यात यावी. शक्य असल्यास फाळणीचा अनुभव घेतलेल्या कुटुंबांतील सदस्यांना कार्यक्रमात सहभागी करून त्यांच्या आठवणी आणि अनुभव नव्या पिढीसमोर मांडण्यात यावेत, असे सौ. संघवी यांनी सांगितले.
प्रदर्शन, लघुपट आणि मौन कँडल मार्च
सौ. संघवी यांनी पुढे सांगितले की, दि. 13 ऑगस्टपासून मुख्य कार्यक्रमस्थळी फाळणीच्या इतिहासावर आधारित विशेष प्रदर्शन भरविता येणार आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या नियोजित भेटी आयोजित करण्यात याव्यात. फाळणीच्या वेदना आणि नागरिकांचे अनुभव मांडणारे ‘द न्यू पोस्ट बॉक्स’, ‘चान कित्थां : द डेरावाल्स अँड पार्टिशन’ आणि ‘पार्टिशन अँड मतुआ कम्युनिटी’ हे लघुपट विद्यार्थ्यांना व नागरिकांना दाखविता येणार आहेत.
मुख्य कार्यक्रमात फाळणीवर आधारित नाट्यप्रयोग, मान्यवरांची भाषणे आणि फाळणीग्रस्त कुटुंबांच्या प्रतिनिधींचे अनुभवकथन आयोजित करता येईल. कार्यक्रमाच्या समारोपावेळी शांततापूर्ण कँडल मार्च काढून फाळणीतील पीडितांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे सौ. संघवी यांनी नमूद केले.
जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि सार्वजनिक संस्थांमध्ये फाळणीच्या इतिहासावर व्याख्याने, चर्चासत्रे आणि जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना ‘मायगव्ह’ पोर्टलवर दि. 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘विभाजन विभीषिका स्मृती दिन’ राष्ट्रीय ऑनलाइन प्रश्नमंजुषेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार असल्याचे सौ. संघवी यांनी सांगितले.
नागरिकांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, आपल्या घरावर सन्मानाने राष्ट्रध्वज फडकवावा आणि सर्व उपक्रमांमध्ये भारतीय ध्वजसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सौ. आशा संघवी यांनी केले आहे.















