
चाकण एमआयडीसीतील रस्ते, वाहतूक कोंडी आणि इतर पायाभूत सुविधासंबंधी अडचणी प्राधान्याने सोडविण्यात येतील. यासाठी चाकणमधील उद्योजक, एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक व जिल्हा प्रशासनासोबत लवकरच बैठक घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली. त्यांनी यासंदर्भात चाकण नागरी कृती समिती व औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी धनंजय शेडबाळे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
उपमुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, खेडचे प्रांत अधिकारी अनिल दौंडे आणि चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांना तातडीने उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या. लवकरच सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन या समस्यांवर मार्ग काढण्यात येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी व्यक्त केला.















