
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाची भारताच्या आर्थिक वाढीत आणि राष्ट्रीय विकासात अर्थपूर्ण योगदान देतील अशा तंत्र उद्योजकांच्या आणि नवोन्मेषकांच्या नवीन पिढीसाठी दिशा देणारी संस्था बनण्याची क्षमता आहे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्यात केले. अभियंत्यांनी केवळ रोजगार शोधण्यापेक्षा इतरांसाठी संधी आणि नोकऱ्या निर्माण करतील अशी तंत्रज्ञान निर्मिती, उद्योग आणि संस्था स्थापन कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, विद्यापीठाचे नियामक मंडळाचे अध्यक्ष विनायक पै, कुलगुरू प्रा. सुनील भिरुड, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दयाराम सोनवणे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. यशोधरा हरिभक्त आदी उपस्थित होते.
सीओईपी ही संस्था जवळपास दोन शतकांपासून भारताचे भविष्य घडवत आहे. संस्थेचा वारसा केवळ शैक्षणिक उत्कृष्टतेवरच नाही, तर तिने घडवलेले अभियंते, उद्योजक, तंत्रज्ञ आणि राष्ट्रनिर्माते यांच्यावर उभा आहे. सीओईपीने केवळ तंत्रज्ञान संस्था न राहता तांत्रिक विचार, नवोपक्रम आणि समस्या सोडवण्याचे जागतिक केंद्र बनण्याची आकांक्षा बाळगली पाहिजे. स्वच्छ ऊर्जा, प्रदूषण, जल सुरक्षा, शाश्वत गतिशीलता, प्रगत उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सेमीकंडक्टर्स आणि हवामान बदल अशा विविध क्षेत्रांतील आव्हानांकडे केवळ आव्हाने म्हणून नव्हे, तर नवोपक्रम, संशोधन आणि परिवर्तनात्मक उपायांच्या संधी म्हणून पाहिले पाहिजे.















