(धडगाव) नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर यावर्षीच्या स्वातंत्र्य दिन सोहोळ्यात पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकवताना उपस्थित राहण्यासाठी तसेच त्यांनी देशवासियांना उद्देशून केलेले भाषण ऐकण्यासाठी देशभरातील विशेष निमंत्रितांना बोलावण्यात आले आहे. यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथे राहणारे लालसिंग वन्या वळवी यांना राजधानी दिल्ली आणि लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिन सोहोळ्यामध्ये सहभागी होण्यासाठीचे विशेष निमंत्रण मिळाले आहे. (Tribal Farmer from Dhadgaon Lal Singh Valvi is invited to Red Fort on 15 August )
15 August : ‘आमु आखा एक से’ एफपीओ ते दिल्लीच्या लाल किल्ल्यावरील निमंत्रणाचा प्रवास !
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथे राहणारे लालसिंग वन्या वळवी राजधानी दिल्ली आणि लाल किल्ल्याला प्रथमच भेट देण्यासाठी आणि स्वातंत्र्यदिन सोहोळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी अत्यंत उत्सुक आहेत. सरकारने त्यांच्या एफपीओचे कार्य ओळखून त्यांना नवी दिल्ली येथे होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहोळ्यासाठी आमंत्रित केल्यामुळे वळवी अत्यंत आनंदित झाले आहेत.नाबार्डच्या मदतीने स्थापन झालेल्या त्यांच्या ‘आमु आखा एक से’ या एफपीओने 200 ते 300 एकर क्षेत्रावर सेंद्रिय आंबा,कोकम, भरड धान्ये आणि तुरडाळ यांचे पीक घेतले आहे. त्यांच्या गावातील दीडशेहून अधिक कुटुंबे या एफपीओमध्ये कार्यरत आहेत.
15 August : महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादक संघटना योजनेचे 24 लाभार्थी लाल किल्ल्यावर उपस्थित राहणार
महाराष्ट्रात राबवण्यात येत असलेल्या शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ) योजनेच्या 24 लाभार्थ्यांना नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर 15 ऑगस्ट 2023 रोजी होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहोळ्यात विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाल किल्ल्यावरून केलेले भाषण ऐकण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या 1800 व्यक्तींमध्ये या योजनेच्या अडीचशे लाभार्थ्यांचा त्यांच्या जोडीदारासह समावेश आहे. केंद्र सरकारच्या ‘लोकसहभागा’च्या संकल्पनेला अनुसरून, केंद्र सरकारने देशभरातून, समाजाच्या विविध घटकांतील लोकांना स्वातंत्र्यदिन सोहोळ्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्याचा हा उपक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमासाठी दिल्लीत आलेल्या विशेष पाहुण्यांना राष्ट्रीय युद्ध स्मारक तसेच पंतप्रधान संग्रहालय या ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.
![FPO from Patan Satara](https://nandurbarnews.in/wp-content/uploads/2023/08/FPO-from-Patan-Satara-1024x576.jpg)
15 August : सातारा जिल्ह्यातील पाटण गावचे शेतकरी उत्तमराव कृष्णा देसाई यांना देखील विशेष निमंत्रण
सातारा जिल्ह्यातील पाटण गावचे उत्तमराव कृष्णा देसाई हे देखील यावर्षीचे विशेष निमंत्रित आहेत. ते पाटण तालुका शेतकरी उत्पादक कंपनी या एफपीओचे अध्यक्ष असून एप्रिल 2021 मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीचे 300 सदस्य आहेत. त्यांची कंपनी इंद्रायणी जातीच्या तांदळासह इतर अनेक दर्जेदार बियाणांचे उत्पादन आणि शेतकऱ्यांना या बियाणांची विक्री करते. यापुढे त्यांनी आपल्या व्यवसायात वैविध्य आणण्याची योजना आखली असून ते आता शेतकऱ्यांना कमी किमतीत शेतीची अवजारे आणि ट्रॅक्टर्स यांची विक्री सुरु करणार आहेत.
15 August : शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट स्थापन करणे ही शेतकरी उत्पादक संघटनांच्या स्थापनेमागील संकल्पना
कृषी मालाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट स्थापन करणे ही शेतकरी उत्पादक संघटनांच्या स्थापनेमागील संकल्पना आहे. ही प्रक्रिया अधिक सुलभतेने होण्यासाठी, केंद्रीय कृषी आणि सहकार विभागाने छोट्या शेतकऱ्यांच्या कृषीव्यवसाय संस्थेच्या स्थापनेचा नियम केला जेणेकरून शेतकरी उत्पादक संघटनेच्या स्थापनेसाठी राज्य सरकारांना पाठबळ मिळेल.
शेतीसाठी लागणारे घटक ते हाती आलेले पीक अशा प्रत्येक कार्यात सदस्य शेतकऱ्यांसाठी संघटक म्हणून काम करणे ही एफपीओची जबाबदारी आहे. संघटनेच्या स्थापनेमुळे मोठ्या प्रमाणातील कार्यातून होणारी काटकसर तसेच सदस्य शेतकऱ्यांची वाटाघाटीची क्षमता यामध्ये सुधारणा होते.
![FPO Maharashtra](https://nandurbarnews.in/wp-content/uploads/2023/08/FPO-Maharashtra-1024x576.jpg)