Home क्रीडा डिस्ने हॉटस्टारवर 12 ऑगस्टपासून फिट इंडिया प्रश्नमंजुषा फेरीचे होणार प्रसारण

डिस्ने हॉटस्टारवर 12 ऑगस्टपासून फिट इंडिया प्रश्नमंजुषा फेरीचे होणार प्रसारण

8
Fit India Show on Disney Hotstar
Fit India Show on Disney Hotstar

फिट इंडिया प्रश्नमंजुषेच्या दुस-या आवृत्तीच्या राष्ट्रीय फेरीचे प्रसारण डिस्ने हॉटस्टार या लोकप्रिय ओटीटी वाहिनीवरून 12 ऑगस्टपासून केले जाईल. एकूण 13 भाग प्रत्येक शनिवार आणि रविवारी सकाळी 8 वाजता प्रसारित केले जातील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनय तिवारी आणि तान्या पुरोहित करतील. (Disney Hotstar to show Fit India Quiz starting from 12th August)

डिस्ने हॉटस्टारवर फिट इंडिया प्रश्नमंजुषा : 36 विजेत्या शाळांना प्रत्येकी 2.5 लाख रुपयांचे रोख पारितोषिक

एकूण 72 विद्यार्थ्यांनी (36 शाळांमधील प्रत्येकी दोन विद्यार्थी) या राज्य फेरीत आपापल्या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधून सर्वोच्च पुरस्कार मिळवले. राज्य फेरीत निवड झालेल्या 36 विजेत्या शाळांचा केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी गेल्या महिन्यात मुंबईत प्रत्येकी 2.5 लाख रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरव केला. या शाळांमधील निवड झालेल्या 2 विद्यार्थ्यांच्या संघाला एकूण 25 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

राष्ट्रीय फेरीतील विजेत्यांसाठी आता एकूण बक्षीसाची रक्कम 25 लाख रुपये एवढी आहे, विजेत्या विद्यार्थ्यांना एकूण 2.5 लाख रुपये रकमेचे  बक्षीस दिले जाईल. राष्ट्रीय स्तरावर उपविजेत्या ठरलेल्या प्रथम आणि द्वितीय क्रमांकावरच्या शाळांना अनुक्रमे 15 लाख आणि 10 लाख रुपये एवढे बक्षीस दिले असेल.

Fit India Show on Disney Hotstar

डिस्ने हॉटस्टारवर फिट इंडिया प्रश्नमंजुषा : भारताचा समृद्ध क्रीडा इतिहास, आरोग्य आणि पोषण यांच्याशी संबंधित विविध विषयांचा समावेश

फिट इंडिया प्रश्नमंजुषेची दुसरी आवृत्ती केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने आयोजित केली आहे. या प्रश्नमंजुषेमध्ये भारताचा समृद्ध क्रीडा इतिहास, आरोग्य आणि पोषण यांच्याशी संबंधित विविध विषयांचा समावेश आहे. गेल्या वर्षी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पूर्वसंध्येला अनुराग सिंग ठाकूर आणि  युवा व्यवहार आणि क्रीडा आणि गृह मंत्रालयाचे राज्यमंत्री निसिथ प्रामानिक  यांनी केंद्रीय शिक्षण,कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत या प्रश्नमंजुषेची सुरुवात केली होती.

या प्रश्नमंजुषेच्या राज्य/केंद्रशासित प्रदेश स्तरावरील फेरीसाठी एकूण 348 शाळा आणि 418 विद्यार्थी निवडले गेले. या विद्यार्थ्यांमध्ये 39% विद्यार्थिनी होत्या. निवड झालेल्या शाळांनी दोन विद्यार्थ्यांचा संघ तयार केला, या दोन विद्यार्थ्यांच्या संघांमध्ये विविध वेब फेऱ्यांच्या माध्यमातून राज्य/केंद्रशासित प्रदेश स्तरावरील स्पर्धेसाठी स्पर्धा घेण्यात आली. 36 राज्य/केंद्रशासित प्रदेश स्तरावरील विजेते निवडण्यासाठी स्पर्धेच्या एकूण 120 फेऱ्या घेण्यात आल्या.

डिस्ने हॉटस्टारवर फिट इंडिया प्रश्नमंजुषा : भारतातील 702 जिल्ह्यांतील 16,702  शाळांमधील  61,981 विद्यार्थ्यांचा सहभाग

फिट इंडिया प्रश्नमंजुषेच्या पहिल्या आवृत्तीच्या यशानंतर दुसऱ्या आवृत्तीला मोठा प्रतिसाद मिळाला. प्रश्नमंजुषेच्या दुसऱ्या आवृत्तीत भारतातील 702 जिल्ह्यांतील 16,702  शाळांमधील  61,981 विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. त्या तुलनेत, फिट इंडिया क्विझच्या पहिल्या आवृत्तीत 13,502 शाळांमधील एकूण 36,299 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. पहिल्या आवृत्तीच्या तुलनेत प्रश्नमंजुषेच्या दुसऱ्या आवृत्तीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत 70% नी वाढ झाल्याचेही दिसून आले आहे.

Fit India Show on Disney Hotstar