Home मनोरंजन सीमा देव यांचे निधन | भावपूर्ण श्रद्धांजली 💐

सीमा देव यांचे निधन | भावपूर्ण श्रद्धांजली 💐

21
Seema Deo
Seema Deo

(मुंबई) चित्रपट सृष्टीत अभिनयाच्या जोरावर आणि प्रेमळ स्वभावाने आदराचे स्थान पटकावणाऱ्या चतुरस्त्र अभिनेत्री सीमा देव यांचे निधन चटका लावून जाणारे आहे, अशा दुःखद भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

सीमा देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Seema Deo)

‘भारतीय चित्रपट सृष्टीत रमेश देव आणि सीमा देव यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती. पडद्यावर आणि प्रत्यक्षातही आदर्श दाम्पत्य, प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचे अनेकांशी स्नेहाचे संबंध होते. देव कुटुंबीय गत अनेक दशके कला क्षेत्राची सेवा करत आहे. सीमा देव यांनी अनेक चित्रपटांतून वैविध्यपूर्ण व्यक्तीरेखा साकारून आपल्या चतुरस्त्र अभिनयाचा परिचय दिला आहे. त्यांच्या जाण्याने देव कुटुंबीय आणि चाहत्यांवर आघात झाला आहे. त्यांना यातून सावरण्याचे सामर्थ्य मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली,’ असे मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. (Seema Deo)

सीमा देव : ‘ब्लॅक अँड व्हाईट’ सिनेमात अभिनयाचे रंग भरणारी अभिनेत्री : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगाचा साक्षीदार आपण गमावला आहे. त्यांच्या निधनाने कृष्णधवल चित्रपटांमध्ये अभिनयाचे रंग भरणारी अभिनेत्री आपण गमावली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. जपान दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना सीमा देव यांच्या निधनाची बातमी समजताच ते भावूक झाले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस अपल्या संदेशात म्हणतात की, ज्येष्ठ अभिनेत्री सीमाताई देव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. ‘आनंद’ चित्रपटातील त्यांची भूमिका संस्मरणीय होती. त्यांनी एक मोठा कालखंड गाजवला. गत वर्षीच रमेश देव आपल्यातून निघून गेले आणि आज सीमाताई! ‘ब्लॅक अँड व्हाईट’ सिनेमात अभिनयाचे रंग भरणारी अभिनेत्री आज आपल्यातून निघून गेली आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगाच्या त्या साक्षीदार होत्या. यशाची शिखरे चढूनही त्यांच्यात असलेला नम्र भाव उल्लेखनीय होता.

त्यांनी अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत भूमिका साकारल्या. त्यांचे आपल्यातून निघून जाणे सिने जगतातील एका अध्यायाची अखेर आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याचे बळ त्यांच्या कुटुंबियांना मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना !

सीमा देव : गत काही वर्षांपासून ‘अल्झायमर’ने आजारी होत्या

सीमा देव गत काही वर्षापासून वृद्धत्वाशी संबंधित आजारांनी त्रस्त त्यांना अल्झायमरचेही निदान झाले होते. त्यांचे पती तथा ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे गतवर्षी 2 फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. तेव्हापासून त्या आपला धाकटा मुलगा अभिनव देव यांच्या वांद्रे स्थित येथील निवासस्थानी राहत होत्या. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. आज सकाळी त्यांनी मुंबईतील आपल्य राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांचा मोठा मुलगा अजिंक्य देव एक आघाडीचा अभिनेता आहे. तर अभिनवही दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहे. सीमा देव यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 5 च्या सुमारास शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सीमा देव यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील सुवर्णयुगाचा अंत -उपमुख्यमंत्री अजित पवार

“ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनाने मराठी, हिन्दी चित्रपटसृष्टीतील सुवर्णयुगाचा अंत झाला आहे. आपल्या सहज अभिनयाने चित्रपट रसिकांच्या हृदयावर तब्बल सहा दशके अधिराज्य गाजवणाऱ्या गुणी अभिनेत्रीला आज आपण मुकलो आहोत. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणतात की, सीमा देव यांचे निधन देशभरातील चित्रपट रसिक, मराठी माणसासाठी धक्कादायक आहे घटना आहे. गतवर्षी रमेश देव यांचे निधन झाले. सीमा देव आणि रमेश देव ही जोडी रुपेरी पडदा आणि वास्तव जीवनातही पती-पत्नींची आदर्श जोडी होती. सीमा देव यांचे निधन मराठी चित्रपटसृष्टी व भारतील कलाक्षेत्रासाठी मोठी हानी आहे. सीमा देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना करतो.

सीमा देव : 2017 मध्ये जीवनगौरव पुरस्कार

सीमा देव यांना 2017 मध्ये जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यांच्या मोलकरीण या चित्रपटातील ‘कशी झोकात चालली कोळ्याची पोर जशी चवथीच्या चंद्राची कोर’ हे गाणे प्रचंड गाजले. रमेश देव व सीमा देव या पती – पत्नींनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केले. यात आनंद या सुप्रसिद्ध हिंदी चित्रपटाचाही समावेश होता. या दोघांची जोडी मराठी सिनेसृष्टीतली एक सदाबहार जोडी म्हणून ओळखली जात होती.

( Nandurbar News )