(तळोदा) तळोदा तालुक्यातील बोरद परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कापसाचे पीक वाचवण्यासाठी टँकरचा आधार घेतलेला दिसून येत आहे.(Nandurbar News)
दुष्काळाची गडद छाया : पिके वाचवायची कशी असा प्रश्न
जुलै महिन्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी कापसासह अनेक पिकांची मोठया प्रमाणात लागवड केली आहे. त्यात कोरडवाहू शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड पावसाच्या पाण्याच्या भरवश्यावर केली असुन निसर्गाच्या पाण्यावर कापूस पीक अवलंबून आहे. अशा परिस्थितीत बोरद येथील किशोर पाटील यांनी आपल्या शेतामध्ये जुलैमध्ये झालेल्या पावसावर कापसाची लागवड केली आहे. त्यांचे क्षेत्र बोरद शिवारात असून त्याचे एकूण क्षेत्रफळ ४ एकर आहे. अशा शेतामध्ये त्यांनी कापसाची लागवड केली, सरासरी होत असलेल्या पाउस पिकाला मृगजळ ठरत होता. सद्य परिस्थितीत कापूस आता दोन महिन्यांचा झाला आहे. त्यामुळे खतासोबत आता पाण्याची देखील मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. परंतू गेल्या अनेक दिवसापासून पावसाने या परिसरामध्ये दडी मारल्याने त्यांचे कापसाचे पीक त्याचबरोबर इतर अनेक शेतकऱ्यांचे पीके ही धोक्यात आली आहेत.अशी गंभीर परिस्थिती असताना पिके वाचवायची कशी असा प्रश्न कोरडवाहू तसेच बागायती शेतकऱ्यांना देखील सतावतो आहे. बागायती शेतकऱ्यांनी आपल्या शेतात केळी, ऊस, पपई असे हुकमी पिकांची लागवड केली आहे. परंतू परिसरात दमदार पाऊस न झाल्याने नदी नाले कोरडेच आहे. त्यामुळे कुपनलिका देखील तग धरून आहे. (नंदुरबार न्युज)
![Drought Situation in Taloda](https://nandurbarnews.in/wp-content/uploads/2023/09/Drought-Situation-in-Taloda-1024x576.jpg)
दुष्काळाची गडद छाया : कापसाचे पीक वाचवण्यासाठी टँकरचा आधार
त्यामुळे अशा परिस्थितीत बोरद येथील किशोर पाटील यांनी आपल्या शेतातील कापसाचे पीक वाचवण्यासाठी टँकरचा आधार घेतलेला दिसून येत आहे. टँकर त्यांनी भाड्याने घेतले असून या टँकरच्या माध्यमातून ते आपल्या शेतातील कापसाच्या पिकाला नळीद्वारे पाणीपुरवित आहेत आणि कापूस वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. शेतातील कुपनलिका देखील कमी प्रमाणात पाणी ओतत आहेत. त्यात महावितरण कमी दाबाचा वीज प्रवाह देत आहे. त्यामुळे कुपनलिकांमधील मोटर जळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. महावितरण तसेच महापारेषन तर्फे फक्त ३ ते ४ तास विद्युत पुरवठा शेतीसाठी केला जात आहे. असे असूनही विद्युत पुरवठा वेळेवर होत नसल्याने या ठिकाणी पिकांना पाणी कसे द्यावे ह्या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे. त्यात रात्रीचा विद्युत पुरवठा होत असल्याने आधीच वन्य प्राण्यांची उपस्थिती या परिसरात वाढल्याने आधीच भीतीचे वातावरण आहे. कोणीही रखवालदार रात्री येण्यास तयार नाही अशा परिस्थितीत जीव मुठीत धरून शेतकरी रात्री शेतात राहून पिकांना पाणी देत आहेत. (नंदुरबार न्युज)
दुष्काळाची गडद छाया : कोरडवाहू सह बागायती शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
अशा अनेक संकटांचा सामना करून ते आपले पिकं कसेतरी वाचवित आहेत. परंतू कोरडवाहू शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडत आहे. असाच जर पाऊस लांबला तर कोरडवाहू शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती या परिसरात निर्माण होताना दिसून येत आहे. सोयाबीनचे पिकं आजच हातातून जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लाऊन आहेत की, कधी पावसाला सुरुवात होईल आणि कधी आपले पिके वाचतील. हवामान विभागानेही दिनांक ६ ,७,८ सप्टेंबर पर्यंत उत्तर महाराष्ट्र विशेष म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे तेवढीच एक भाबडी आशा आहे. मात्र येत्या आठवडयात पाऊस न झाल्यास कोरडवाहू सह बागायती शेतकऱ्यांसमोर मोठे संकट येऊन ठेपणार आहे हे मात्र निश्चित आहे. (नंदुरबार न्युज)