(नंदुरबार) – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबारच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या औचित्याने योगासन व बॉक्सिंग समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम सकाळी 9 वाजता कमला नेहरु कन्या विद्यालय, नंदुरबार येथे पार पडला.
सत्राचे उद्घाटन मा. राजेश्री अहिरराव, मुख्याध्यापिका, कमला नेहरु कन्या विद्यालय यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी तालुका क्रीडा अधिकारी महेश पाटील, क्रीडा अधिकारी ओमकार जाधव, संजय बेलोरकर, क्रीडा मार्गदर्शक भगवान पवार, क्रीडा शिक्षक मयुर ठाकरे, बॉक्सिंग कोच योगेश माळी आणि योगा प्रशिक्षिका कु. तेजस्विनी चौधरी उपस्थित होते.

या समुपदेशन सत्रात विद्यार्थ्यांना योग आणि बॉक्सिंग या खेळांचे शारीरिक तंदुरुस्ती व मानसिक स्वास्थ्य वाढविण्यातील महत्व समजावून सांगण्यात आले.
योगा मार्गदर्शक कु. तेजस्विनी चौधरी यांनी दैनंदिन जीवनातील योगाचे महत्व पटवून देत विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर केले. तर बॉक्सिंग कोच योगेश माळी यांनी बॉक्सिंगच्या मूलभूत तंत्रांचे मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांद्वारे प्रत्यक्ष प्रात्यक्षिके घेऊन खेळाबाबतची उत्सुकता वाढविली.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त घेतलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, आत्मसंयम आणि क्रीडाभावना दृढ करण्यास मोठी मदत झाली.
#NationalSportsDay#SportsForAll#FitIndia#YogaForLife#BoxingSkills#Nandurbar#YouthAndSports#HealthyLifestyle#SportsDay2025