
केंद्र – मालपाडा, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार
उपक्रमाचे नाव – केंद्र स्तरीय स्पर्धा परीक्षा: ओळख व तयारी
उद्दिष्टित विद्यार्थी – इयत्ता 4 ते 8 वी, दुर्गम डोंगराळ भागातील शाळा
सातपुडा पर्वतरांगेच्या अतिदुर्गम भागात, केंद्र-मालपाडा (पं. स. अक्कलकुवा) येथे शिक्षण विभागातर्फे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षांविषयीची तोंडओळख निर्माण करण्यासाठी ‘स्पर्धा परीक्षा ओळख व तयारी’ हा उपक्रम अत्यंत यशस्वीरीत्या राबविण्यात आला.
या उपक्रमाची संकल्पना गटशिक्षणाधिकारी मा. श्री. प्रशांत नरवाडे, विस्तार अधिकारी मा. श्री. मंगेश निकुंभ यांच्या प्रेरणेतून आणि केंद्रप्रमुख मा. श्री. मनोज साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाली. सर्व शिक्षक, मुख्याध्यापक यांचे सहकार्य या यशामागील महत्त्वाचा दुवा ठरले.
उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट –
1. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची, अभ्यासाची आणि आत्मविश्वासाची सवय विकसित करणे.
2. स्पर्धा परीक्षांची भीती दूर करून लहान वयातच योग्य दिशा देणे.
3. दुर्गम भागातील प्रतिभावान विद्यार्थ्यांचा शोध घेणे.
4. रूटीन चाचणी, हॉल क्रमांक, बैठकीचा अनुशासन सराव देणे.
5. शैक्षणिक गुणवत्ता आणि व्यक्तिमत्त्व विकासाचा समतोल राखणे.
उपक्रमाची अंमलबजावणी –
15 ऑगस्ट ते 31 डिसेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांनी विविध विषयांचा अभ्यास केला. जानेवारी 2025 मध्ये केंद्रस्तरीय परीक्षेचे आयोजन करण्यात आले. इयत्ता 4 ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 50 गुणांची प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली – ही प्रश्नपत्रिका स्वतः केंद्रप्रमुख श्री. मनोज साळवे यांनी तयार केली व परीक्षा दिनांकापर्यंत गोपनीय ठेवण्यात आली.
या परीक्षेत जवळपास 90 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. परीक्षेत अव्वल स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 26 जानेवारी रोजी ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये –
1. या उपक्रमातून तयार झालेल्या आत्मविश्वासाने विद्यार्थ्यांनी इतर उपक्रमांमध्येही उत्स्फूर्तपणे भाग घ्यायला सुरुवात केली.
2. कॉपीमुक्त परीक्षा, निरिक्षणशक्ती, निर्णयक्षमता, आणि स्पष्ट संवाद कौशल्ये यांची पायाभरणी झाली.
3. नियमित शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले; वाचन आणि सर्जनशील लेखनाला चालना मिळाली.
फलश्रुती – ग्रामीण भागातील यशस्वी बदल:
जि.प. शाळा निंबीपाडा (मोलगी) या शाळेतील विद्यार्थ्यांनी यशस्वी सहभाग घेतल्याने ग्रामस्थांनी 8 वी इयत्ता सुरु करण्यासाठी पुढाकार घेतला. पालकांचे शाळेविषयीचे सकारात्मक मत वाढले, त्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि गुणवत्तेचा आलेख चढता झाला. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी चित्रकला, नृत्य, नाटक, हस्तकला आणि सामान्य ज्ञान स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपले कौशल्यही उंचावले.
याच उपक्रमाच्या अंतर्गत जि.प. शाळा निंबीपाडा (मोलगी) शाळेला मा. श्रीम. वंदना वळवी (शिक्षणाधिकारी) व त्यांच्या टीमने भेट दिली. या भेटीच्या अनुषंगाने केंद्रस्तरीय स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये मा. श्री. मनोज साळवे (केंद्र प्रमुख, मालपाडा) आणि जि.प. शाळा निंबीपाडा (मो.) शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा व मार्गदर्शन दिले. शिक्षकांचे समर्पण, विद्यार्थ्यांचा प्रामाणिक सहभाग आणि प्रशासनाची सक्रिय भूमिका यामुळे स्पर्धा परीक्षेचा हा उपक्रम तालुकास्तरावर एक प्रेरणास्पद यशोगाथा ठरला आहे.

#स्पर्धा_परीक्षा#विद्यार्थी_गुणवत्ता#सातपुडा_शिक्षण#अक्कलकुवा#NandurbarShines#ZPschoolSuccess#EduTransformation#DigitalNandurbar















