अंकुश पालवे
(नंदुरबार)
अलीकडील मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील काही रस्त्यांची व पुलांची अवस्था खालावल्याने नागरिकांना झालेल्या गैरसोयीचे गांभीर्य लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने महत्त्वपूर्ण पावले उचलली असल्याची माहिती नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे यांनी दिली आहे. चुकीच्या अफवांना फाटा देत नागरिकांना खात्री दिली आहे की, जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी, पुनर्बांधणीसाठी आणि नव्या जोडण्या देण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
अधिकृत स्त्रोतांवरच विश्वास
अलीकडे काही सामाजिक माध्यमांत, यूट्यूबवर आणि काही चॅनेल्सवर जिल्ह्यातील रस्त्यांची स्थिती अतिशयोक्ती करून दाखवली गेली. त्यामुळे जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जिल्ह्यातील रस्त्यांची सतत पाहणी करण्यात येत आहे. कार्यकारी अभियंता व इतर अधिकारी नियमितपणे वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर करत असून, आवश्यक त्या ठिकाणी तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेतली जात आहेत.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीची कामे
पावसामुळे नाले, ओढे, स्थानिक नद्यांमधील पाण्याचा प्रवाह वाढल्याने काही ठिकाणी रस्त्यांचे नुकसान झाले आहे. परिणामी पाईप मुळे, फरशी पूल किंवा लहान पुलांवर परिणाम झाला. अशा ठिकाणी वाहतुकीत अडथळा निर्माण झाल्याने विभागाने तातडीच्या दुरुस्ती व मजबुतीकरणाचे काम सुरू केले आहे. यासाठी आवश्यक प्रस्ताव शासनाकडे मंजूरीसाठी पाठवले गेले असून, निधी उपलब्ध होताच व्यापक दुरुस्तीची कामे सुरू केली जाणार आहेत.
जिल्ह्यातील महत्त्वाचे मार्ग प्राधान्याने
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात येणारे राज्य मार्ग (रा.मा.) व प्रमुख जिल्हा मार्ग (प्र.जि.मा.) यांवरील रस्त्यांची देखभाल व दुरुस्तीचे काम नियमितपणे केले जात आहे. या मार्गांवर 50 किमी/ता. व 30 किमी/ता. वेगमर्यादेचे पालन करण्याची सूचना वाहनचालकांना देण्यात आली आहे. तसेच, रस्त्यांच्या कडेला झालेली मातीची धूप, सरकलेली माती, भूस्खलन, ढिगाऱ्यांमुळे अडथळे यांची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाने हाती घेतली आहे.
सुरक्षिततेसाठी नागरिकांना आवाहन
पावसाळ्यातील प्रतिकूल हवामानामुळे काही भागांत वाहतुकीत अडचण येऊ शकते, मात्र नागरिकांनी काळजीपूर्वक वाहन चालवावे. नियमांचे पालन करून सुरक्षितता राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. रस्त्यांची दुरुस्ती होईपर्यंत आवश्यकतेनुसार वाहतूक वळवली जाणार असून, वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. पालवे यांनी केले आहे.
जिल्हा रस्ता धोरण आराखडा
नंदुरबार जिल्ह्यातील अजूनही मुख्य रस्त्यांशी न जोडलेल्या वाड्या, पाड्यांना पक्क्या रस्त्यांची जोडणी मिळावी यासाठी विभागाने विशेष उपक्रम सुरू केला आहे. “जिल्हा रस्ता धोरण आराखडा” (District Road Strategic Plan for Unconnected Villages & Padas) तयार करून शासनाला सादर करण्यात येणार आहे. हा आराखडा लवकरच अंतिम करण्यात येईल. या प्रक्रियेत लोकप्रतिनिधी. स्थानिक संस्था, ग्रामपंचायती, शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच नागरिकांचेही मत व सूचना महत्त्वाच्या ठरणार आहेत. सर्व नागरिक, लोकप्रतिनिधी व संस्थांनी आपल्या मागण्या, सूचना व प्रस्ताव 30 सप्टेंबर 2025 पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात सादर कराव्यात, असे आवाहन कार्यकारी अभियंता अंकुश पालवे यांनी केले आहे.
रस्ते हा फक्त प्रवासाचा मार्ग नसून शिक्षण, आरोग्य, रोजगार, व्यापार आणि एकंदर जीवनमान उंचावण्यासाठी आवश्यक घटक असल्याचे श्री. पालवे यांनी अधोरेखित केले आहे. ग्रामीण भागातील विकास, शहरी भागातील सुविधा आणि आदिवासी भागातील संपर्क यासाठी उत्तम रस्त्यांची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर विभागाचे प्रयत्न जिल्ह्याच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, असेही त्यांनी नमूद केले आहे.
0000000000
















