Home शेती टोमॅटो दरवाढीच्या अनुषंगाने तातडीने उपाययोजना कराव्यात : कृषि आयुक्त

टोमॅटो दरवाढीच्या अनुषंगाने तातडीने उपाययोजना कराव्यात : कृषि आयुक्त

9
Toamto Rates Hike in India
Toamto Rates Hike in India

(पुणे) सध्या बाजारात वाढलेले टोमॅटोचे दर व त्याबाबत उपाययोजना करण्यासाठी कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. चालू खरीप हंगामातील टोमॅटो पिकाखालील क्षेत्र व उत्पादनाबाबत माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी यावेळी दिले.

टोमॅटो उपलब्धतेबाबत अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश

राज्यात टोमॅटो पिकाखाली सर्वसाधारण ५६ ते ५७ हेक्टर क्षेत्र आहे. खरीप हंगामात सर्वसाधारणपणे ४० ते ४२ हजार हेक्टर क्षेत्र तर रब्बी व उन्हाळी हंगामात सर्वसाधारण १६ ते १७ हजार हेक्टर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली जाते. यापासून सर्वसाधारणपणे १० लाख मे. टन उत्पादन अपेक्षित असते. डिसेंबर २०२२ ते मे २०२३ दरम्यान टोमॅटोला अतिशय अल्प दर मिळाल्याने या पिकाच्या नवीन लागवडीवर त्याचा परिणाम झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.

तसेच मार्च पासून मे महिन्यापर्यंत अवेळी पाऊस, गारपीट यामुळे टोमॅटो आणि इतर भाजीपाल्याचे नुकसान झाल्याने पिकाच्या उत्पादनावर परिणाम झाल्याचे दिसून येते. यावर्षी पाऊस उशिरा आला असून सरासरीच्या ५४ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे लागवडीस उशीर झाला आहे, असेही यावेळी श्री. चव्हाण यांनी सांगितले.

टोमॅटो पिकावरील कीड व रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने कराव्यात. नाशिक, पुणे, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, लातूर व नागपूर या जिल्ह्यांमध्ये टोमॅटो लागवडीचे प्रमुख क्षेत्र असून सर्व संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हा अधीक्षक कृषि अधिकाऱ्यांनी नवीन लागवडीबाबत सविस्तर अहवाल सादर करावा, अशा सूचनाही श्री. चव्हाण यांनी यावेळी दिल्या.

बैठकीला सर्व कृषि विद्यापिठांचे कुलगुरु, संशोधन संचालक तसेच सर्व जिल्ह्यांचे अधीक्षक कृषि अधिकारी उपस्थित होते. (Latest Nandurbar News)