
(नंदुरबार) आत्मा विभाग, कृषी विज्ञान केंद्र, कोळदा आणि इंडियन ग्रामीण सर्व्हिसेस (ASK फाऊंडेशन, मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘समृद्ध किसान’ प्रकल्पांतर्गत दिनांक 12 व 13 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हास्तरीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रशिक्षणात मंडप शेती व वेलवर्गीय भाजीपाला लागवड तंत्रज्ञान या विषयावर शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. प्रवीण अहिरे (टीम लीडर, IGS संस्था) यांनी करताना, मंडप शेतीच्या गरजांवर व त्याच्या भविष्यातील संधींवर प्रकाश टाकला. त्यांनी मंडप शेतीमुळे उत्पादनात वाढ, कीड व रोगांचे नियंत्रण आणि वर्षभर उत्पन्न घेण्याच्या संधी यावर भर दिला.
आत्मा विभागाचे प्रकल्प संचालक श्री. दिपक पटेल यांनी मंडप शेती ही शाश्वत उत्पन्नासाठी एक मजबूत पर्याय असून शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, असे आवाहन केले. कृषी विज्ञान केंद्राचे मुख्य समन्वयक श्री. राजेंद्र दहातोंडे यांनी ‘नंदुरबार तालुका हा मंडप शेतीसाठी नवापूर मॉडेल प्रमाणे यशस्वी ठरू शकतो,’ असे सांगून, स्थानिक स्तरावर लागवड, विपणन व प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याची गरज असल्याचे नमूद केले. या प्रशिक्षणात डॉ. वैभव गुरवे (विषयतज्ञ) यांनी वेलवर्गीय भाजीपाला लागवडीसाठी पीक निवड, खत व्यवस्थापन, सिंचन तंत्रज्ञान तसेच भाजीपाला नर्सरी निर्मिती यावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
प्रगतशील शेतकरी श्री. राजू पटेल (गाव – कोळदा) यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देत, मंडप शेतीतील लागवड, सॉर्टिंग-ग्रेडिंग व विक्री व्यवस्थापन यासंबंधीची माहिती शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून मिळाली. श्री. पद्माकर कुंदे यांनी किड व रोग व्यवस्थापनावर तसेच विषमुक्त भाजीपाला उत्पादनावर भर देण्याचे महत्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. यश सोनवणे यांनी शेतकरी व आयोजकांचे आभार मानून प्रशिक्षणाचा समारोप केला.
या प्रशिक्षणाद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार देत उत्पादन व नफा वाढवण्याचा मार्ग दाखविणे, तसेच स्थानिक पातळीवर टिकाऊ शेतीचा विकास साधणे हा उद्देश होता.
अशा प्रकारची प्रशिक्षण कार्यशाळा शेतकऱ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी अत्यंत उपयुक्त असून, यामुळे जिल्ह्यातील शेती क्षेत्रात सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे.
#मंडपशेती#भाजीपालालागवड#कृषीप्रशिक्षण#आधुनिकशेती#फळभाजीपाला#AgriTraining