नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील सिसा गावातील रंजना अशोक रहासे या महिला बचत गटाच्या माध्यमातून स्वावलंबनाचा आदर्श ठरत आहेत. त्या राणीदिवाली महिला बचत गटाच्या सक्रिय सदस्य असून, तोरणा CMRC (लोकसंचलित साधन केंद्र), धडगाव – माविम नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली आपला व्यवसाय यशस्वीरीत्या उभारण्यात त्यांनी यश मिळवले आहे.
रंजनाताईंनी आपल्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीस हातभार लावण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी माविम अंतर्गत उद्योग-व्यवसाय विषयक प्रशिक्षण घेतले.
व्यवसायाची प्रगती:
सुरुवातीला त्यांनी गटामार्फत १५,००० रुपये आणि बँकेकडून ३५,००० रुपये, अशा एकूण ५०,००० रुपयांचे कर्ज घेऊन थंडपेय दुकान सुरू केले. यासोबतच लाडकी बहीण योजनेतील निधीचा उपयोग करून कैरी लोणचे उत्पादन देखील सुरू केले. व्यवसाय उभारणीसाठी आणि बँकेकडून कर्ज उपलब्ध होण्यासाठी लोकसंचलित साधन केंद्र व्यवस्थापक रमिला वसावे यांनी विशेष मदत केली.
छोट्या प्रमाणात सुरू झालेला हा व्यवसाय ग्राहकांच्या पसंतीमुळे हळूहळू वाढत गेला. आज त्यांच्या थंडपेय दुकान आणि लोणचे व्यवसायातून दर महिन्याला ५,००० ते ७,००० रुपये उत्पन्न मिळते, जे कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यासाठी महत्त्वाचे ठरत आहे.
रंजनाताईंच्या मेहनत, चिकाटी, योग्य कर्जपुरवठा, गटाचे सहकार्य आणि माविमचे मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाले आहे. त्या आज इतर महिलांसाठी प्रेरणास्थान ठरल्या असून, ‘योग्य नियोजन, मार्गदर्शन आणि आत्मविश्वास असेल तर कोणताही व्यवसाय यशस्वी करता येतो’ हे त्यांचे उदाहरण सांगते.
पुढील काळात व्यवसाय वाढीसाठी लागणाऱ्या भांडवलासाठी विविध योजनांमध्ये प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
ही यशोगाथा दाखवते की महिला बचत गट, माविम आणि नव-तेजस्विनी कार्यक्रम यांच्या संधींचा उपयोग करून ग्रामीण महिला स्वावलंबनाचा मार्ग यशस्वीरीत्या निवडू शकतात.
#नवतेजस्विनी#माविमनंदुरबार#महिला_सक्षमीकरण#बचतगट#स्वावलंबन#यशोगाथा#WomenEmpowerments#mavim#selfhelpgroups#nandurbar
















