
‘एआय’ चा वापर कौशल्यपूर्ण केला तर अधिक सुलभपणे काम करता येऊ शकते, असे मत कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशोर जस्मानी यांनी व्यक्त केले. मंत्रालय येथे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयात वृत्तपत्र,इलेक्ट्रॉनिक व डिजिटल प्रसार माध्यमांसाठी चार दिवसीय कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत ‘डिजिटल कन्टेंट क्रिएशन इन द एज जनरेटिव्ह एआय’ या विषयावर कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशोर जस्मानी बोलत होते.
कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशोर जस्मानी म्हणाले की, १९५६ मध्ये ‘कृत्रिम बुद्धिमत्ता या संकल्पनेचा जन्म झाला आणि तेव्हापासून मशीन शिकत होती, पण गेल्या दशकात ती समजायला आणि निर्णय घ्यायला शिकली आहे. ‘एआय’ला आपण दिलेल्या प्रचंड प्रमाणातील माहितीवरून ती शिकते. लाखो पुस्तके, कोट्यवधी लेख आणि डिजिटल डेटातून ती ज्ञान घेत असते. उदाहरणार्थ, काही एआय मॉडेल दररोज १ कोटींपेक्षा अधिक लेख वाचतात आणि त्यावरून उत्तरं तयार करतात. ‘एआय’ला जेवढी अचूक माहिती दिली जाईल, तेवढे अचूक परिणाम ती देते.म्हणजेच मानव जितका सजग, ‘एआय’ तितकी हुशार होतात. एआयचा वापर – आपल्या रोजच्या जीवनात आज आपण वापरत असलेले बहुतेक डिजिटल प्लॅटफॉर्म्स एआयवर आधारित आहेत.
यावेळी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे,सरचिटणीस दिपक भातुसे यासह पत्रकार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.















